Tiger Died : कारच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा अखेर मृत्यू; वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त
Tiger Died In Accident : रात्रीच्या वेळी कारला धडकल्याने जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गोंदिया : कारच्या धडकेत वाघ गंभीर (Tiger Accident) जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोंदिया- कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल परिसरात घडली होती. दरम्यान जखमी वाघाला नागपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. या वाघाचा मृत्यूने वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त परिसर असून वाघांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत आणखी भर व्हावी याकरिता 20 मे 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून दोन वाघिणी आणून सोडलेल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यातील मुरदोली जंगल परिसरात वाघाचा सतत वावर असतो. अश्यातच एक वाघाचा बछडा रस्ता ओलांडत असतांना भरधाव कारने त्याला धडक दिली. या कारच्या धडकेत हा नर वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता नागपूर ला नेताना वाटेतच कोहमारा जवळ वाघाचा मृत्यू झाला.
Dear friends Wildlife has first right of way in #wildlife habitats. So always travel safely & slowly. This tiger hit by vehicle at Nagzira. Via @vijaypTOI pic.twitter.com/fpx6zlKQDI
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) August 11, 2023
सदर नर वाघ हा नागझिरातील T- 14 वाघिणीचा 2 वर्षाचा बछडा होता. सकाळ पासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरू होते. दरम्यान वाघाला जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर वाघाला नागपूर ला नेतांनी वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला. वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पुढील उत्तरीय तपासणी नागपूर गोरेवाडा येथे आज दुपारून होणार आहे.
रेस्क्यु दरम्यान वनविभागाची मोलाची भूमिका
रेस्क्यु (Rescue) दरम्यान वन विभागाचे उपसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, RRT साकोलीची चमू यांचा सहभाग होता.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटझिन्सकडूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. काहींनी भरधाव वेगाने कार चालवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. जंगलाच्या वाटेने कारमधून जाताना वन्यजीवांचा विचार करून वाहने चालवण्याचा सल्लाही काहींनी दिला आहे.