Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Praful Patel : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेतील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गोंदिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेतील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच काही नेत्यांची महामंडळांवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेंनी स्वपक्षीयांच्या नियुक्त्या केल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक बोलावली होती. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं नाव नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जातंय का? असे विचारले असता प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमचे कुठलेही आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचंय आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे. हे सगळे विषय आता बाजूलाच केलेले बरे. आपपल्या मतदारसंघांमध्ये काम करून लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
जागा वाटपावर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
गोंदिया विधानसभेवर राष्ट्रवादी लढणार का? असे विचारले असता प्रफुल पटेल यांनी विधानसभा जागावाटपावर अद्याप तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. एक-दोन दिवसांमध्ये बैठका होणार असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत तसेच आमचे सरकार पुन्हा आले तर आम्ही नागरिकांना आणखी चांगल्या योजना देऊ, असेही प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही : प्रफुल्ल पटेल
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. सरकारला गुडघ्यावर टेकवल्याशिवाय सोडणार नाही, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे. यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी मला कोणाच्या वादावादीमध्ये पडायचं नाही. मात्र, मराठा आरक्षणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही. सरकारने त्यांना आरक्षण दिलेले आहे. मात्र, काही गोष्टी तांत्रिकही असतात, सरकार या बाबीला प्रामाणिकपणे घेत आहे. तरी देखील आंदोलन करण्यात येते आहे तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, चर्चा करून देखील याच्यावर मार्ग काढता येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा गोंदिया-भंडारामध्ये येणार
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा या महिन्याच्या अखेरीस गोंदिया भंडारा या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. जनसन्मान यात्रा ही अजित पवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आली आहे. यानिमित्त नागरिकांच्या व सामान्य मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. सरकारने जनसामान्यांसाठी ज्या चांगल्या योजना राबविल्या आहेत त्यांची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहचणे ही आमची जबाबदारी आहे. यासाठी ही जनसन्मान यात्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा