Nagpur Online Fraud : आधी 17 कोटींची रोकड, सोनं, चांदी जप्त; आता साडेचार कोटींचं सोनं ताब्यात, आरोपीच्या लॉकरमध्ये घबाड
Nagpur Online Fraud : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदियामधील चार बँक लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4.54 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने एवढं ऐवज जप्त केले आहे.
Nagpur Online Fraud : ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदियामधील (Gondia) चार बँक लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Nagpur Police) 4.54 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने एवढं ऐवज जप्त केले आहे. सोंटूने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.
आतापर्यंत 31 कोटींची रोकड आणि दागिने जप्त
हे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी अजूनही सोंटू दुबईतच आहे. तपासात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चार लॉकरमधून सुमारे साडेचार कोटींचे रोकड आणि दागिने जप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी सोंटूच्या गोंदिया येथील घरातून नागपूर पोलिसांनी 16 कोटी 59 लाख रुपये रोख, बारा किलो सोने आणि 294 चांदी जप्त केली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 31 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत. नागपूर पोलिसांच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्तीची ही पहिलीच वेळ आहे.
टुरिस्ट व्हिसावर सोंटू जैन दुबईला पळाला
पोलिसांनी सध्या या प्रकरणी मौन बाळगले असून सोंटू जैनला अटक केल्यानंतर या संदर्भात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांच्या छाप्यापूर्वीच सोंटू जैन टुरिस्ट व्हिसावर दुबईला पळून गेला होता. मूळच्या गोंदियाच्या मात्र सध्या नागपुरात स्थायिक झालेल्या एका व्यापाऱ्याने सोंटूने ऑनलाईन गेमिंगमध्ये 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.
काय आहे प्रकरण?
नागपुरात ऑनलाईन गेमच्या (Online Game) माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. नोव्हेंबर 2021 पासून ही फसवणूक सुरु होती. तक्रारदार व्यापारी व्यवसायाच्या निमित्त आरोपीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे दोघांचा परिचय होता. आरोपीने ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची बतावणी केली. आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यावर रम्मी, कॅसिनो आणि तीनपत्ती या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले दाखवले. आधी व्यापाऱ्याने त्यास नकार दिला. मात्र, आरोपीने जास्तच आग्रह केल्याने व्यापारी तयार झाला. आरोपीने व्यापाऱ्याला 'डायमंड एक्सचेंज डॉट कॉम' या लिंक पाठवून त्याचं लॉगिन आणि पासवर्ड तयार करुन ऑनलाईन बेटिंग सुरु केले. सुरुवातीला बँक खात्यात आठ लाख रुपये जमा झाल्याचे व्यापाऱ्याला दिसलं. त्यानंतर व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला व्यापारी जिंकला. त्यानंतर तब्बल 58 कोटी रुपये हरला. अनंत हा सतत जिंकत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला. त्याने त्याला पैसे परत मागितले. मात्र अनंतने पैसे देण्यास नकार दिला. याशिवाय त्याला कुठे वाच्यता केल्यास अपहरण करुन मारण्याचीही धमकी दिली. त्यातून त्याने उर्वरित चाळीस लाख रुपयेही अनंतला दिले. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
संबंधित बातमी