(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंदिया जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात, पहिले ते तिसरीचे वर्ग भरतात एकाच छताखाली
शिक्षणाच्या दयनीय अवस्थेचं चित्र गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला या गावात पाहायला मिळते. नवीन इमारतीची मागणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने बकरीच्या गोठ्यात बसून शिक्षण पूर्ण करावे लागत आहे.
गोंदिया : देशाची भावी पिढी शाळेत घडते... मात्र, गोंदियातील (Gondiya) डिजिटल शाळेतील चिमुकले चक्क बकरीच्या गोठ्यात बसून विद्यार्जनाचे धडे गिरवत आहेत. आश्चर्य किंवा विश्वास वाटत नाही ना... पण, हे सत्य आहे. ही विदारक परिस्थिती गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला गावातील आहे. गावातील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीची मागणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने बकरीच्या गोठ्यात बसून शिक्षण पूर्ण करावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्याने आपल्या नीतिनिर्धारणात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. निदान असं सांगितलं तरी जातं, मात्र शिक्षणाच्या दयनीय अवस्थेचं चित्र गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला या गावात पाहायला मिळते. गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत 20 वर्षातच जीर्णवस्थेत आली. शाळेतील स्लॅबचा भाग खाली कोसळू लागला. इतकेच नव्हे तर, ठेकेदारेने या शाळेचे बांधकाम इतके निकृष्ट केले की, स्लॅबचा लेन्टर देखील हळूहळू वाकू लागला आहे. शाळेतील हरिणखेडे गुरुजींनी याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापन समितीला देखील दिली. मात्र, वर्ष लोटूनही शाळेला नवीन वर्ग खोली न मिळाली नाही. पाठपुरावा करुनही प्रत्यक्ष बांधकाम आणि निधीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल होत आहे.
हरिणखेडे गुरुजींनी शाळेशेजारी असलेल्या तेजराम रहांगडाले यांच्या घरी शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. रहांगडाले यांच्याकडे असलेल्या बकऱ्या ते घराच्या ओसरीत (पडवीत) बांधत होते. ती जागा त्यांनी निःशुल्क दिली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला. मात्र, गोठ्याला लागूनच गावाचा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. गोठ्यात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही. अशातच वर्ग खोलीसह शाळेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश काढून घेतला आहे. त्यामुळे मागील वर्षी शाळेची पटसंख्या 19 होती. आता ती घटली असून नऊवर गेली आहे. आता या बकरीच्या गोठ्यात भरणाऱ्या डिजिटल शाळेत पहिली ते तिसरीच्या केवळ सहा मुली आणि दोन मुले शिक्षक घेत आहेत.
शाळेची इमारत नसल्याने विद्यार्थी सर्व ऋतु झेलत विद्यार्थी शिक्षण घेतात. पावसाळ्यात मुलांना शिकवण्यात अडचणी येतात. ज्या ठिकाणी उत्तम इमारती आहेत त्या ठिकाणी शिक्षक नाहीत. जिथे दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाही. मात्र ज्या भागात विद्यार्थ्यांची वानवा नाही त्या भागात उत्तम सुविधा देणे प्रशासनाच्या हातात आहे. तेवढे झाले तरी बरेच साध्य होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: