Gondia NCP : प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांचा दणका; गोंदियातील माजी खासदार पवार गटात दाखल
NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील अजित पवार गट आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे (Khushal Bopche) आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी शरद पवार प्रवेश केला आहे. बोपचे यांनी मुबंईत शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डॉ. राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.
राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अजित पवार गटासोबत राहिलेले माजी खासदार आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुबंईत भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 च्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहिलेले युवा नेते रविकांत बोपचे यांनी सुद्धा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
बोपचे पितापुत्रांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा हादरा बसला आहे. दोनच दिवसापूर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पटेल गटाला हादरा दिला होता.
300 कार्यकर्त्यांची अजित पवारांना सोडचिठ्ठी, शरद पवार गटात प्रवेश
प्रफुल्ल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतील (NCP Crisis) फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात पकडला.
2 जुलै 2023 ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. मात्र गोंदिया जिल्हा हा प्रफुल्ल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने राष्ट्रवादीत कुठेही फूट पडल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र या फुटीनंतर वरिष्ठ स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम करावे लागले. मात्र राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना सोबत काम करत असताना सामान्य कार्यकर्त्यांची धुसफुस सुरू होती. भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्रास होत असे. तसेच ज्या पद्धतीने भाजपने खासगीकरण करण्याच्या सपाटा सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
ही बातमी वाचा: