Bhandara Rain : भंडारा, गोंदियात गंभीर पूरस्थिती, महाराष्ट्राचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला
Bhandara Rain : भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. मडगी ते ढाबा मार्गावर पाणी आल्याने जवळपास 25 गावांचा संपर्क तुटला आहे. शहराच्या विविध भागात पुराचं पाणी शिरलं आहे.
भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान मांडले आहे.आज जरी पावसाने विसावा घेतला असला तरीही मात्र अनेक भागात पूर परिस्थिती आताही कायम आहे. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीला पूर आला आहे. महाराष्ट्राचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला आहे. आमगाव येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याला जोडणारा रस्त्यावर 5 फूट पाणी असल्याने मध्यप्रदेश राज्यात लांजी , दहेगाव, कारंजा, कुलापा, साडरा येथे जाणारे नागरिक अडकले आहेत.
भंडारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीला पूर आला आहे. टाकली- खमाटा इथं पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. मडगी ते ढाबा मार्गावर पाणी आल्याने जवळपास 25 गावांचा संपर्क तुटला आहे. शहराच्या विविध भागात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे प्रशासनाने जवळपास दीडशे कुटुंबाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे.
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून 15 हजार 180 क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे 2020 नंतर पुन्हा गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भंडारा शहरातील बीटीबी भाजी मार्केटला पुराचा वेढा पडला आहे. तीन ते चार फूट पाणी साचल्याने मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे भंडारा, गोंदिया, नागपूर आणि मध्यप्रदेशाला होणारा भाजीपुरवठा ठप्प झाला आहे.
पूरस्थितीमुळे महाविद्यालयीन परीक्षा रद्द
भंडारा गोंदियात मुसळधार पाऊस आहे. पूरस्थितीमुळे भंडारा गोंदियातल्या महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या. पुरामुळे सर्वांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं शक्य नसल्यानं निर्णय घेण्यात आला आहे नागपूर विद्यापीठ लवकरच परीक्षांची नवी तारीख जाहीर करणार आहे.
राज्याला पावसानं झोडपलं
राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुंबई, पुणे, सातारा सह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. आता मुंबईत पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सोमवारपासून पावसानं हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनही पावसाची रिपरिप सुरुच होती. गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.