Gadchiroli : अपघातात महिलेचा मृत्यू, संतप्त जमावानं आठ ट्रक पेटवले
Gadchiroli : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या अवजड मालवाहतूक करणा-या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
Gadchiroli Latest Crime News : गडचिरोलीत संतप्त जमावाने आठ ट्रक पेटवले. मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे ही घटना घडली. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या अवजड मालवाहतूक करणा-या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. बिजोली जयदार असे मयत महिलेचे नाव आहे. या अपघातानंतर गावकऱ्यांनी मालवाहतूक करणारी ट्रकची रांग पेटवून दिली. ह्या मार्गावरून रोज 500 ते 600 ट्रक माल वाहतूक करत असतात.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 353 असून हैदराबादला जोडला जातो. मागील अनेक वर्षांपासून ह्या मार्गाचं काम रखडलेलं आहे. ह्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली आहेत. पण राष्ट्रीय महामार्ग विभागाने वन विभागाकडे बोट फिरवली आहेत. वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हा संपूर्ण आष्टी ते सिरोंचा पर्यत 145 किलोमीटरचा मार्ग मागील 3 वर्षापासून रखडला आहे. त्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावण्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग खड्डेमय झाले आहेत. त्यात शेकडो ट्रक ह्या रस्त्यातून जात असल्याने रोडाची दुरवस्था झाली आहे. लोकांना नाहक त्रास सहन करत ह्या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ह्या मार्गावरील पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक करण्याची ग्रामस्थांची मागणी प्रलंबित आहे. मात्र प्रशासन एकमेकांना दोष देण्यात अनेक वर्षे लोटली आहेत.
जिल्ह्याच्या इतिहासात एकमेव प्रकल्प सुरू झाला तो म्हणजे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पय ह्याची लीज 2007 मध्ये लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड यांना देण्यात आली. मात्र ते प्रत्यक्षात सुरू करणे, इतके सोपे नव्हते. कारण हा संपूर्ण भाग घनदाट जंगल आणि नक्षल्यांचा वावर असलेला भाग आहे. त्यामुळे कुणीही ह्या भागात काम करायला तयार नाही. मात्र लॉयड मेटलला जेव्हा याची लीज मिळाली, त्यांनी ह्या भागात काम करण्यासाठी त्या भागात एन्ट्री केली. मात्र नक्षल्यानी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांला ठार केलं. त्यामुळे ह्या भागात भविष्यात कोणीही कंपनी काम करेल याची आशा सोडली होती. मात्र मागील फडणवीस सरकारच्या काळात ह्या प्रकल्पाला परत एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र नक्षल्यानी प्रकल्पाच्या कामावर असलेल्या 80 हुन अधिक वाहनांची जाळपोळ करून परत एकदा हा प्रकल्प बंद पाडला. मात्र त्या नंतर ह्या प्रकल्पासाठी पोलीस यंत्रणेची मदत घेतली आणि त्यांच्या सुरक्षेत हा प्रकल्प परत एकदा सुरू झाला. एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावाजवळ ह्या प्रकल्पाच्या कच्चा माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा एसटी महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला. त्यात काही लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे संतप्त जमावाने अशाच प्रकारे 12 हुन अधिक ट्रकांची जाळपोळ केली होती.
त्यानंतर लॉयड मेटलने त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीला आपलं काम करण्यासाठी संधी दिली. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ह्या कामाला वेग आला आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ह्यांनी ह्या प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक 5 हजार लोकांना ह्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली. ह्या प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करण्यासाठी मुख्य त्या मार्गाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ह्या मार्गावरून शेकडो वाहने जात असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. ह्यामुळे अनेक घटना घडल्या जात आहेत, ह्याचाच रोष बुधवारी झालेल्या अपघातानंतर लोकांनी 8 वाहनांची जाळपोळ करून रोष व्यक्त केला.