दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच दारु कारखान्याला परवानगी, डॉ. अभय बंगाचा तीव्र विरोध; मुख्यमंत्र्यांना पत्र
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दारु कारखान्याला ( liquor factory) परवानगी देण्यात आलीय. याच मुद्यावरुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (dr. Abhay Bang) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिंहलं आहे.
Gadchiroli : दारुबंदी असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दारु कारखान्याला ( liquor factory) परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोली एमआयडीसीमध्ये या कारखान्याच्या कामाचे भूमिपूजनही झालं आहे. याच मुद्यावरुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग (dr. Abhay Bang) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिंहलं आहे. तसेच या निर्णयावर टीका देखील केली आहे. दारु निर्मितीच्या कारखान्याला अभय बंग यांनी विरोध केला आहे.
दोन लाख माणसं दरवर्षी दारुमुळं मरतात
भारतात तीन कोटी माणसं दारुमुळं व्यसनग्रस्त आहेत. दोन लाख माणसं दरवर्षी दारुमुळं मरतात. तरुणांमधील मृत्यूच्या कारणापैकी हे एक महत्वाचं कारण दारु हे आहे. आदिवासी दारुला लवकर बळी पडतात. त्यामुळं दारु वाढवायची की कमी करायची हा प्रश्न असल्याचे डॉ. अभय बंग म्हणाले. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारु सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी द्यायला हवी का? असा सवालही बंग यांनी केला. शासनाने स्वत:च त्यांचा कायदा मोडावा का? अनेक गावातील लोक दारुमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात दारुचा कारखाना काढणं योग्य आहे का? असा सवालही बंग यांनी केली. जिल्ह्यात सुरु होणारी दारु कुठं विकली जाणार आहे? असा सवाल बंग यांनी केला. यामध्ये आदिवासींचं शोषण होणार असल्याचे बंग यांनी म्हटलं आहे. राज्यातील जनतेने याविरोधात आवाज उठवावा असेही अभय बंग म्हणाले.
दारु कारखान्याला अभय बंग यांचा तीव्र विरोध
गडचिरोली जिल्ह्यात एलबीटी बिव्हरेज नावाने मोहफुलापासून दारू बनविण्याचा कारखाना सुरू होणार आहे. गडचिरोली एमआयडीसी मध्ये एलबीटी बिवरेज या कंपनीचे भूमिपूजन पार पडले आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचे भूमिपूजन गडचिरोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि राज्याचे अन्न-औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. या कारखान्यावरून आता मोठे वादळ उठले आहे. प्रस्तावित कारखान्याचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा दारू मुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. डॉ. बंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्देशून टीकेचे पत्र लिहिले आहे.
दारु निर्मिती आदिवासी आणि इथल्या स्त्रियांच्या हितासाठी मारक
या कारखान्याला जिल्ह्यातील दारू मुक्ती संघटनांना आणि दारूबंदीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून गुप्तपणे शासकीय परवानगी देण्यात आली असा आरोपही अभय बंग यांनी पत्रात केला आहे. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एवढी मोठी आदिवासी द्रोही कृती केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी अंमलात असून 2016 पासून महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू नियंत्रण पथदर्शी प्रयोग "मुक्तिपथ" या नावाने राबवला जात आहे. जिल्ह्यातील 1100 गावातील लोकांनी प्रामुख्याने स्त्रियांनी दारूबंदीचे समर्थनार्थ सरकारकडे प्रस्ताव दिलेले आहे. 700 पेक्षा जास्त गावांनी त्यांच्या गावात बेकायदेशीर दारू विक्री बंद पाडली आहे. शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी पन्नास हजार पेक्षा जास्त पुरुषांनी दारू सोडली आहे. असे असताना अचानक जिल्ह्यात दारु निर्मितीचा कारखाना उघडण्याची घाई आदिवासी आणि इथल्या स्त्रियांच्या हितासाठी मारक ठरेल असे डॉ. बंग यांनी म्हटले आहे. राज्यातील जनतेने याविरोधात आवाज उठवावा असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Facts: एखाद्याने सात दिवस दारु प्यायली तर काय होईल? माणसाला दारुचं व्यसन नेमकं कसं लागतं? जाणून घ्या