(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli Naxal : तब्बल 21 वर्षानंतर संपला नक्षलग्रस्त भागातील श्रीरामांचा वनवास; गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जवानांनी उघडले मंदिराचे दार
नक्षलवाद्यांने बंदुकीच्या धाकावर 2003 मध्ये श्रीरामाचे मंदिर कायमचे बंद केले होते. अखेर आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरक्षा दलाच्या जवानांनी हे मंदिर कायमचे ग्रामस्थासाठी खुले केले आहे.
Gadchiroli Naxal News: काही महिन्यांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) संपन्न झाली. त्यामुळे तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून प्रदीर्घ काळा लोटल्यावर अखेर प्रभू श्रीरामाचं राम मंदिरात आगमन झालं. 'न भुतो न भविष्यती' असा भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. मात्र, अशाच दंडकाराण्यांतील एका मंदिरातील रामरायांना तब्बल दोन दशके आपल्या भक्तांची वाट पाहावी लागलीय. अखेर आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल 21 वर्षांनंतर या मंदिरात श्रीरामाचा जयजयकार निनादला आहे. ही गोष्ट आहे छत्तीसगड (Chhattisgarh) मधील सुकमा जिल्ह्यातली.
नक्षलवाद्यांनी (Naxal Attack) बंदुकीच्या धाकावर 2003 मध्ये हे मंदिर कायमचे बंद करण्याचा आदेश दिले होते. परिणामी, नक्षलवाद्यांनी या मंदिराचे नुकसान करत या मंदिराचे दरवाजे कायमचे बंद केले होते. मात्र, आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या मंदिराचे दार गावकऱ्यांसाठी कायमचे खुले केले असून आज या ठिकाणी या मंदिराची डागडुजी आणि स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे रामललाचा 21 वर्षांचा वनवास अखेर आज संपला आहे.
तब्बल 21 वर्षांनंतर खुल झाले श्रीरामाचे मंदिर
सुकमा जिल्ह्यातील लखपाल आणि केरळपेंडा गावातील ही घटना आहे. पाच दशकांपूर्वी इथे राम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र हळूहळू या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढल्यानंतर राममंदिरात पूजा करण्यासाठी जाण्याचे धाडस कुणी करत नव्हतं. कालांतराने 2003 मध्ये नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर नक्षलवाद्यांनी हे मंदिर पूजेसाठी कायमचे बंद केले होते. मात्र, अलिकडे सुरक्षा जवानांनी या परिसरात मोठी कारवाई करत नक्षल्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याने या परिसरात नक्षल्यांचा वावर कमी झाला आहे.
सोबतच या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानाच्या 74 व्या बटालियनने संबंधित भागात कॅम्प लावल्यानंतर नक्षल्यांचे धाबे दणाणले आहेत. अखेर स्थानिकांच्या मागणी नुसार पोलिसांनी हे मंदिर ग्रामस्थांच्या पूजेसाठी कायमचे खुले करण्यात आले आहे. आज सुरक्षा दलाच्या जावानांनी या मंदिराची डागडुजी आणि स्वच्छता करून मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केलंय.
नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर केले होते मंदिर कायमचे बंद
14 मार्च 2024 रोजी या परिसरात गस्त घालत असताना सुरक्षा दलाच्या जवानांना हे मंदिर दिसून आले. प्रथमदर्शी हे मंदिर अतिशय जीर्णअवस्थेत असून अतिशय पुरातन असल्याचे दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार या मंदिरावर कधीकाळी मोठे सण-उत्सव देखील होत होते. दरम्यान, या मंदिराबाबत अधिक तपास केला असता, अशी माहिती मिळाली की हे मंदिर 2003 पासून नक्षलवाद्यांनी धाक दाखवून बळजबरीने बंद केले होते. तसेच या मंदिराला नुकसान देखील पोहोचवले होते. त्यानंतर नक्षल्यांचा वावर या परिसरात कमी झाल्याने पोलिसांकडे स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर खुले करण्याबाबत मागणी केली होती.
या मागणीनुसार आज अखेर या मंदिराचे जीर्णोद्धार आणि साफसफाई करून हे मंदिर पुन्हा गावकऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी बोलतांना दिलीय. आमचे प्रयत्न आहे की ज्याप्रकारे ग्रामस्थांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला तसेच स्थानिकांनी या क्षेत्रातील विकासकामांसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या