(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : विदर्भातील फळउत्पादकांना मिळणार दर्जेदार रोप; संत्रा व मोसंबी उत्पादकांना होणार लाभ
या फळरोपवाटीकेच्या माध्यमातून नरखेड व काटोलसह कळमेश्वर व सावनेर, वरुड व मोर्शी, कारंजा व आर्वी तर मध्यप्रदेशातील पांढुर्णा, या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची संत्रा व मोसंबीचे रोपे उपलब्ध होईल.
नागपूरः गेल्या अनेक दशकांपासून बंद पडलेल्या तालुका बिज गुणन केंद्राच्या जागेवर फळरोपवाटीका उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून याचा लाभ प्रामुख्याने विदर्भातील फळ उत्पादकांना होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
नरखेड येथील तालुका बिज गुणन केंद्राची जवळपास 50 एकर जागा ही गेल्या अनेक वर्षापासुन पडीत होती. यामुळे या जागेवर अद्यावत फळरोपवाटीका व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या फळरोपवाटीकेला मंजुरी मिळाली असून लवकरच येथे अद्यावत पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
नरखेड तालुक्यातील नवेगाव शिवारात कृषी विभागाच्या माध्यमातुन तालुका बिज गुणन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात जागेचा कोणताही वापर होत नसल्याने केंद्रासाठी संपादीत करण्यात आलेली 50 एकर जागा ही पडीत होती. या भागात शेतकऱ्यांच्या हिताचे नविन काही तरी प्रकल्प उभे राहावे यासाठी या भागाचे आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले. या बिज गुणन केंद्राच्या जागी अद्यावत अशी फळरोपवाटीका उभारल्यास प्रामुख्याने विदर्भातील फळउत्पादकांना लाभ मिळेल या व्हिजनने त्यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला. याकरीता त्यांनी कृषी विभागाला अहवाल तयार करण्यासाठी निर्देशही दिले होते. त्याप्रमाणे कृषी आयुक्त कार्यालय नागपूर यांनी अहवाल तयार करुन राज्य सरकारला सादर केला. या अहवालाच्या माध्यमातुन ही फळरोपवाटीका मंजुर होण्याच्या दुष्टीकोणातुन सलील देशमुख यांनी सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह या विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. शेवटी नरखेडच्या या फळरोपवाटीकेला मंजुरी मिळाली असून नुकताच शासन आदेश जारी झाला आहे.
दर्जेदार रोप निर्मितीचा लाभ
या फळरोपवाटीकेच्या माध्यमातून नागपूर जिल्हातील नरखेड व काटोलसह कळमेश्वर व सावनेर, अमरावती जिल्हातील वरुड व मोर्शी, वर्धा जिल्ह्यातील कारंजा व आर्वी तर मध्यप्रदेशातील पांढुर्णा, या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची संत्रा व मोसंबीचे रोपे उपलब्ध होणार असल्याची माहीती सलील देशमुख यांनी दिली. या फळरोपवाटीकेत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत फळबाग लागवड व महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत कलमे व रोपांची निर्मीती करण्यात येणार आहे.
लवकरच प्रत्यक्ष कार्याला सुरुवात
जागेवर भौतीक सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने संरक्षण भिंत, सिंचनाची व्यवस्था व सोबत पॉलीहाऊसची निर्मीती करण्यात येणार आहे. या सुविधा निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रोप निर्मितीला सुरुवात होणार आहे. या फळरोपवाटीकेतुन संत्रा व मोसंबी उत्पादकांना चांगल्या दर्जाचे रोपे मिळावे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येणार आहे. याही पुढे जावुन शेतकऱ्यांना सातत्याने मागर्दशन होण्याची दुष्टीकोणातुन येथे प्रयत्न करण्यात येणारअसल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.