एक्स्प्लोर
पवार कुटुंबातील राजकीय कलह | ठिणगी कुठे पडली?
आज सकाळपासून सुरु झालेल्या या राजकीय नाट्यामुळे सगळे चकित झाले आहेत. यात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अजित पवारांनी अचानक भाजपला साथ देत सत्तास्थापनेसाठी सहकार्य करत स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पवार परिवारात कलहाची कबुली आज सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मात्र हा कलह नेमका कधीपासून सुरु झाला? याविषयी जाणून घेऊ.
मुंबई : राजकारणात काका-पुतण्याचा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही अनभिज्ञ होते. पवार परिवारात राजकीय कलह असल्याच्या बातम्या या आधी देखील बाहेर आल्या होत्या मात्र या वृत्तांचे खंडण पवार परिवारातील सदस्यांनी वेळोवेळी केले आहे. आज अखेर खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून 'Party and family Splits' म्हणजेच 'पक्ष आणि कुटुंबात फूट' असं स्टेटस ठेवत परिवारात कलह असल्याचे कबूल केले. यावेळी मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे अतिशय भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले होते.
मात्र पवार कुटुंबामध्ये कलह आणि फुटीची सुरुवात खऱ्या अर्थाने पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या विषयापासून झाली. एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी द्यायची असं सांगून शरद पवारांनी माढ्यातून स्वत:ची निश्चित उमेदवारी रद्द केली. या घटनेपासून खऱ्या अर्थाने फॅमिलीतील कलहाला सुरुवात झाली.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नांची शर्थ केली. तेव्हाच पवार कुटुंबातील फुटीची पहिली ठिणगी पडली. पण राजकीय जाणकारांच्या मते रोहित पवारांचा राजकारणातील उदय हा पवार कुटुंबातील कलहाचा मूळ मुद्दा आहे.
त्यानंतर ईडी प्रकरणावेळी शरद पवारांनी दिवस जिंकला असला असला तरी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यावर कडी केली. त्यानंतर दोन दिवस फक्त अजित पवार यांच्या राजीनाम्याचीच चर्चा होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातले. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत पवारांना त्रास होत असल्यामुळे, विनाकारण ईडीने त्यांचे नाव गोवले असल्यामुळे राजीनामा दिला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आल्याचे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
मग निवडणुका आल्या, निवडणुकांमध्ये अजित पवारांनी पुन्हा धुरा सांभाळली. शरद पवार यांच्या करिष्म्यामुळे राष्ट्रवादीला अनपेक्षितपणे चांगल्या जागा मिळाल्या. स्वत: अजित पवार राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. निकालानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी बनली. एक महत्वाची बैठक मुंबईत होती. 'ही बैठक रद्द झाली, मी बारामतीला निघालो', असं सांगून अजित पवारांनी संभ्रम निर्माण केला. त्यानंतर मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी अजित दादांनी चेष्टा केली असेल, असे म्हणत या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी चेष्टा केली होती गंमत केली होती अशी सारवासारव केली गेली, पण तेव्हाच पडद्यामागे काहीतरी झालं असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
तसंच दिल्लीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेलाही अजित पवार अनुपस्थित होते तर ते शरद पवारांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचा वृत्तांत लाईव्ह पाहात होते. चार नोव्हेंबरला ज्या दिवशी मुख्यमंत्री पहिल्यांदा निकालानंतर दिल्लीत आले होते त्याच दिवशी पवार सोनिया गांधींना भेटले. अजित पवार त्यादिवशी शरद पवारांसोबत होते. पत्रकार परिषदेनंतर अजित पवराकुठे निघून गेले याच्या बद्दलची चर्चा सुरू होती.
आज अखेर सकाळी अचानक अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात चक्क उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्राला एक मोठा धक्काच बसला. आमच्या परिवारात सर्व निर्णय कुटुंबप्रमुख (शरद पवार) घेतात असं सांगणाऱ्या अजित पवार यांनी आपल्याच पक्षाला मोठा धक्का देत सरकार स्थापण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यांची बहिण सुप्रिया सुळे यांनी ‘विश्वास कोणावर ठेवायचा. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक. त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याला प्रेम दिलं आणि बघा मोबदल्यात मला काय मिळालं’ असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुळे यांना अश्रू अनावर झाले. तर 'अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे पवार 'कुटुंबप्रमुख' शरद पवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement