Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे होते?; तीन वर्षांआधी समोर आली होती महत्वाची माहिती
Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या दिवशी आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा वारंवार विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय.

Disha Salian Death Case: दिशा सालियन हत्या प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर या याचिकेद्वारे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आलीय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही चौकशी करा अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. एनआयएसारख्या संस्थांकडून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप सतीश सालियन यांनी केलाय. 8 जूनच्या पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचल्यावर माहोल बदलला. दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असा आरोप दिशाच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे.
दिशा सालियनच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिका-यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी आदित्य ठाकरे कुठे होते?
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या दिवशी आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा वारंवार विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय. मात्र यावर 2022 रोजीच आदित्य ठाकरेंनी दिशाचा मृत्यू झाला, त्यावेळी ते कुठे होते, यावर एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला होता. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आजोबांवर (रश्मी ठाकरे यांचे वडील) रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.
दिशाच्या मृत्यूच्या दिवशी कुठे होतात?, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

