शिंदे गटाच्या महिला आमदाराचा पायऱ्यावर ठिय्या; उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांकडूनही आत्मदहनाचा इशारा
साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक निवडून आल्याने बहुमताची सत्ता त्यांच्याकडे आहे. मात्र, नगराध्यक्षांच्या 6 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

धुळे : जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या (sakri nagarpalika) नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत धुळे जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे 18 जून रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते. मात्र, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक (Election) निर्णय अधिकारी रोहन कुवर हे साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळल्याने अविश्वास प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर, सरकारी अनास्थेविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे.
साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक निवडून आल्याने बहुमताची सत्ता त्यांच्याकडे आहे. मात्र, नगराध्यक्षांच्या विरोधात त्यांच्या कारभारासंदर्भात 6 नगरसेवकांनी तीन वर्षानंतर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्यास त्याला विरोधक सदस्यांचे पाठबळ मिळाल्याने अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याने अविश्वास प्रस्तावासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी वेळेवर उपस्थित का झाले नाहीत हा देखील प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी नगराध्यक्ष जयश्री पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर चार ते पाच सदस्यांनी वेळ संपल्याचे सांगत निघून जाण्याचे पसंत केले.
उपनगराध्यक्षांचा आत्मदहन करण्याचा इशारा
आता नगराध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरुन वातावरण चिघळलं असल्याने हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर येऊन ठेपेल याची उत्सुकता देखील निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि सदस्यांना मिळालेले लेखी पत्र, यात कुठेही कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित नसल्याने अविश्वास ठरावाच्या विरोधात असलेले सदस्य बाहेर पडले तर अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ सभागृहात काही सदस्य उपस्थित आहेत. आता, यावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान, नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव केवळ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे बारगळला असल्याने यामागे काही षडयंत्र तर नाही ना असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळेच, सरकारी अनास्थेविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे.
आमदाराचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर ठिय्या
जो पर्यंत अविश्वास ठरावासंदर्भात प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला असून याबाबत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी साक्री विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर जिल्हाधिकारीच उपस्थित नसल्याने आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या दिला असून जोपर्यंत अविश्वास ठरावा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अविश्वास ठरावाची निवडणूक ही कोणाच्या तरी दबावाखाली होऊ दिली नसल्याचा आरोप मंजुळा गावित यांनी केला आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांना धक्का























