Dhule News : धुळ्यातील मूर्ती विटंबनाप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा, श्रीराम मंदिराजवळ महाआरती
Dhule News :धुळे शहरात (Dhule) आज विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा (Morcha) काढण्यात आला.
Dhule News : धुळे शहरात (Dhule) झालेल्या मूर्ती विटंबना घटनेनंतर आज विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तसेच भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा (Morcha) काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आग्रा रोड भागात असलेल्या श्रीराम मंदिराजवळ (Shreeram Mandir) महाआरती करण्यात आली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शांततेत हा मोर्चा पार पडला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले असून राज्यभरात (Maharashtra) ठिकठिकाणी वादाची परिस्थिती आहे. संगमनेर, अहमदनगर (Ahmednagar), कोल्हापूर (Kolahpur), घोटी आदी शहरातनंतर धुळ्यातही वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरवात झाली. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर हा मोर्चा आग्रा रोड भागात असलेल्या श्रीराम मंदिराजवळ आल्यानंतर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धुळे शहरात झालेल्या कथित मूर्ती विटंबना प्रकरणी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला मोठया संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या भागात असणारी नागरिकांची वर्दळ आज काही प्रमाणात कमी झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले. शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागातून मोर्चा मार्गस्थ होऊन अर्ध्या तासात मोर्चा आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात पोहोचला. या ठिकाणी महाआरती करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील सर्व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवण्यात आली होती.
500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात
धुळे शहरातील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या विटंबरेच्या निषेधार्थ आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जवळपास दहा हजाराहून अधिक भाविक नागरिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं. या मोर्चात ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिरात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची मिरवणूक देखील समाविष्ट करण्यात आली असून आज होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले होते. याच वेळी तणाव निर्माण होऊ नये, म्हणून सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त त्याशिवाय धुळे एसआरपीएफची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली होती. सद्यस्थितीत हा मोर्चा पार पडला असून पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही तैनात आहे.