Uddhav Thackeray : पंजाब सरकारप्रमाणं हेक्टरी 50 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करा, मराठवाड्यातील नुकसानाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे.

धाराशिव :राज्याचे माजी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारनं पीएम केअर फंडातून मदत करत कर्जमुक्ती करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्याला सरकारला कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांसोबत शिवसेना म्हणून उभं राहणार आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं.
Uddhav Thackeray on Marathwada Flood : आम्हाला यात राजकारण आणायचं नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, आज सकाळपासून मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागामध्ये धावती भेट देत आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे सहकारी आहेत. आपल्या माध्यमातून संकटाची भीषणता सर्वांना कळलेली आहे. मी मराठवाड्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले तसं यात राजकारण आणायचं नाही. त्याच बरोबरीनं सरकारकडून होणारी मदत तूटपुंजी असेल तर ती स्वीकारता येणार नाही म्हणजे तो आकडा मान्यता करता येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एकरी तीन चार म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा
उद्धव ठाकरे यांनी या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षानंतर आलंय असं म्हटलं. काही शेतकऱ्यांच्या मते त्यांच्या आयुष्यात एवढं भीषण संकट मराठवाड्यावर कोसळेललं आहे. जमीन खरडून गेल्या आहेत, पीक सडून गेलेत, घरं दारं वाहून गेली आहेत, गुरं वाहून गेले, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या आहेत. एकूणच शेतीच नाही इथल्या शेतकऱ्याचं आणि आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलं आहे, असं ठाकरे म्हणाले. सरकारनं मदत केलीय ती तूटपुंजी आहे. एकरी साडेतीन चार हजार मिळत आहेत. नुकसान झालंय त्याची साफ सफाई करायला गेलं तर त्याच्या दुप्पट खर्च येणार आहे, म्हणजे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतेय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला..
पंजाबप्रमाणं हेक्टरी 50 हजार रुपये द्या
उद्धव ठाकरे यांनी पुढं म्हटलं की, पंजाब राज्यात काही दिवसांपूर्वी असं संकट आलं होतं. तिथल्या आप सरकारनं शेतकऱ्यांना कालबद्ध मर्यादेत मदत जाहीर केलीय ती हेक्टरी 50 हजार देऊ शकत असेल तर महाराष्ट्रानं द्यायला काही हरकत नाही. परत एकदा सांगतो आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही. मोबाईलवर बातम्या पाहिल्या, लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोटी खर्च करत आहोत असं अजित पवार म्हणाले ही मस्ती आहे. त्यातील घोटाळे बाहेर येत आहेत तो वेगळा भाग झाला. लाडक्या बहिणीच्या घरी 1500 रुपये दिले जातात, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत सावरणार आहे का याचं उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, असा सवाल ठाकरेंनी केला.
शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत
पीक विम्याची वाईट परिस्थिती आहे तो तर एक घोटाळाच आहे. बँकांच्या नोटिशी येत आहेत, तुमच्याकडे येणाऱ्या नोटिशी एकत्र करुन जवळच्या शिवसेनेच्या शाखेत नेऊन द्या.नंतर काय करायचं ते आम्ही बघतो. शेतकऱ्यांसोबत बोललो त्यांची मागणी लावून धरणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं माझा स्वभाव नाही. तशीच कर्जमुक्ती करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री म्हणतात योग्यवेळी करु म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यावर 2019 ला कर्जमाफी करताना अटी टाकल्या होत्या.शेतकऱी म्हणाला याच्यापेक्षा एकवेळ गळफास लावून घेतो, तुमची कर्जमाफी नको. मात्र, शेतकऱ्यांना सांगणं आहे आत्महत्येचा विचार मनात आणू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सरसकट कर्जमुक्ती करा
मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ कधी येणार आहे. पंचांग बघून, मुहूर्त काढून सांगणार आहात का? शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीची केली पाहिजे, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. ती मागणी पूर्ण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
पंजाब सरकारप्रमाणं राज्यातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळावेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारनं यासाठी मदत केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्यावी. करोनाच्या काळात पीएम केअर फंड निर्माण केला होता, त्याचा मायबाप कोण आहे कळत नाही. करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडात जमा केले गेले. पंतप्रधानांनी पीएम केअर फंडाचा वापर आता करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी किंवा हेक्टरी 50 हजार रुपये द्यावेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
























