Osmanabad Water Storage Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक
Osmanabad Water Storage Update : जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे.

Osmanabad Water Storage Update : यंदा मान्सून उशिरा आला, त्यात जुन महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे वातावरण तयार झाले. मराठवाड्यात देखील याच काळात पावसाने हजेरी लावली. मात्र, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यात अजूनही मोठा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडे पडतांना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांची 726.962 दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे. जिल्ह्यातील 34 प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरु होऊन दुसरा महिना संपत आला असतांना शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाऊस पडतांना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल 34 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांनाचा विचार केल्यास फक्त 7.32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती...
- जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 17, लघु 208, असे एकूण 226 प्रकल्प आहेत.
- जिल्ह्यातील या 226 प्रकल्पांची साठवण क्षमता 726.962 आहे.
- या प्रकल्पातून अनेक शहरे व गावांना पाणीपुरवठा होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले तर वर्षभर पाणीपुरवठा होत असतो.
- 27 जुलैपर्यंत एकूण 226 प्रकल्पात 53.2468 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
- त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही 7.32 इतकीच आहे.
- जिल्ह्यातील 34 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
- तसेच जिल्ह्यातील 110 प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
- तर 67 प्रकल्पात 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे.
- 12 प्रकल्पात 26 ते 50 टक्के पाणीसाठा आहे.
- केवळ तीन प्रकल्पातच 51 ते 75 टक्क्यापर्यंत पाणीसाठा आहे.
मागील वर्षे जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस प्रकल्पात 233.4804 दलघमी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी 32.12 टक्के इतकी होती. मात्र यावर्षी जोरदार पाऊस न झाल्याने 7.32 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
