Dharashiv Crime News : आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; न्यायालयाने सुनावली जन्मठेपीची शिक्षा
Dharashiv Crime News : आरोपीचे कृत्य हे दया दाखवण्यास पात्र नसल्याचे नमूद करून आरोपी सूरज शिंदे यास आजन्म कारावास अर्थात जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
धाराशिव: जिल्ह्यातील एका हत्या (Murder) प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 2021 मध्ये एका प्रकरणात आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून मुलाने आईच्या प्रियकराची हत्या केली होती. चाकूने भोसकून या तरुणाने आईच्या प्रियकराचा खून केलं होता. दरम्यान, आता याच प्रकरणात आरोपी तरुणाला न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर शहरात जुलै 2021 मध्ये ही घटना उघडकीस आली होती. सूरज शिंदे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, शंकर गायकवाड याची हत्या करण्यात आली होती.
अधिक माहितीनुसार, आरोपी सूरज शिंदे आपल्या आईसोबत राहत होता. दरम्यान, मयत शंकर गायकवाड याचे सूरज शिंदे याच्या आईसोबत अनेक दिवसापासून (जुलै 2021 पूर्वी) अनैतिक संबंध होते. याची माहिती सूरज कळाली होती. त्यामुळे, त्याचा शंकरवर प्रचंड राग होता. यावरून सूरज व शंकर यांच्यात अनेकदा वादही व्हायचे. मात्र, याचवेळी शंकरला कायमचा संपवण्याचा निर्णय सूरजने घेतला. त्यामुळे 21 जुलै 2021 रोजी सूरजने शंकर गायकवाडला तुळजापूर शहरातील विश्वनाथ कॉर्नर जवळील एका गोडाऊनमध्ये बोलावले. सायंकाळी पाच ते सव्वापाचच्या सुमारास शंकर पोहचला. मात्र, याच ठिकाणी सुरजने त्याची हत्या करत त्याला कायमचं संपवलं.
छाती व पोटावर वार केले...
शंकर हा गोडाऊनमध्ये पोहचताच सुरजने आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या छाती व पोटावर वार केले. यावेळी जीव वाचविण्यासाठी शंकर गायकवाड गोडावूनबाहेर पळू लागला. मात्र, त्याला अडवून पुन्हा त्याच्यावर सुरजने हल्ला केला. त्यानंतर तो गोडाऊन बाहेर पडला. यावेळी रोडवर मयत शंकर गायकवाडचे नातलग जयराज झोंबाडे, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच इतर नागरिक उभे होते. त्यांना देखील हातातील चाकू दाखवत सूरज शिंदे बाहेर पडला. जाताना सूरज याने झोंबाडे यांना धमकावत त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन तो फरार झाला.
न्यायालय म्हणाले आरोपीचे कृत्य हे दया दाखवण्यास पात्र नाही...
सुरुज फरार होताच शंकर गायकवाड याला तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर अवस्थेत असलेल्या शंकर गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सूरज शिंदे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच त्याला अटक करून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आदीनाथ काशीद व सपोनि सुशील चव्हाण यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यावेळी समोर आलेला पुरावा व अतिरीक्त शासकीय अभियोक्ता जयंत देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र 3 व्ही. जी. मोहिते यांनी सदरील आरोपीचे कृत्य हे दया दाखवण्यास पात्र नसल्याचे नमूद करून आरोपी सूरज शिंदे यास आजन्म कारावास अर्थात जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: