Parbhani Murder : सावत्र भावाच्या खून प्रकरणी दोन भावांना जन्मठेप, 25 हजारांचा दंड, चार वर्षांनंतर परभणी न्यायालयाचा निकाल
Parbhani Crime : बाजारात टेबल लावण्यावरून झालेल्या वादाचं पर्यंवसन हाणामारीत झालं आणि दोघा सावत्र भावांनी कोयत्याने एकाची हत्या केली. चार वर्षानंतर आता या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
![Parbhani Murder : सावत्र भावाच्या खून प्रकरणी दोन भावांना जन्मठेप, 25 हजारांचा दंड, चार वर्षांनंतर परभणी न्यायालयाचा निकाल parbhani crime two brothers sentenced to life imprisonment fined Rs 25000 in case of murder of step brother Parbhani Murder : सावत्र भावाच्या खून प्रकरणी दोन भावांना जन्मठेप, 25 हजारांचा दंड, चार वर्षांनंतर परभणी न्यायालयाचा निकाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/5994ec1ca2161617012dd968cd74109b1698167979175290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी: शहरातील गुजरी बाजारातील 2019 साली झालेल्या खून प्रकरणी (Parbhani Murder) दोघांना जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा परभणी न्यायायाने सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी हे मयताचे सावत्र भाऊ असून किरकोळ वादातून त्यांनी त्यांच्या सावत्र भावाचा खून केला होता. चार वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन निकाल लागला आहे.
दुकानासमोर लाकडी टेबल लावण्याच्या कारणावरून सावत्र भावांमध्येच बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीनंतर दुसऱ्या दिवशीच दोन सावत्र भावांनी कोयत्याने वार करून एका भावाच खून केल्याप्रकरणी दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस. नायर यांनी सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली.
किरकोळ कारणावरून वाद
परभणी शहरातील गुजरी बाजार येथील रहिवाशी असलेले तसेच या प्रकरणातील फिर्यादी नारायण आडणे आणि त्यांचा भाऊ सोमनाथ आडणे हे साखर घाठीचे व्यवसायिक होते. 3 एप्रिल 2019 रोजी गुजरी बाजार येथे दुकानासमोर लाकडी टेबल लावण्याच्या कारणावरून त्यांची सावत्र भाऊ आरोपी नितीन आडणे व सचिन आडणे यांच्यासोबत बाचाबाची झाली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 एप्रिल रोजी सोमनाथ आडणे हे गुजरी बाजार येथे टेबलाजवळ आले. त्यावेळी आरोपी आणि त्याचा सावत्र भाऊ नितीन आडणे, सचिन आडणे या दोघांनी मासे कापण्याचे सत्तुर हातात घेऊन थेट सोमनाथ यांच्यावर वार केले. तसेच आसपास असलेल्या दगड आणि विटा घेऊन डोक्यात वार केले.
या मारहाणीत सोमनाथ गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या एकूण प्रकरणी शहरातील नानल पेठ पोलीस ठाण्यात नारायण आडणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचे तपास अधिकारी सपोनि. राजकुमार पुजारी, पो नि. गोवर्धन भुमे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. ऑटोचालक साक्षीदार फितुर झाला. इतर साक्षीदार, वैद्यकीय अहवाल महत्त्वाचे ठरले.
मंगळवारी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने नितीन आडणे, सचिन आडणे या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षे कारावास सुनावण्यात आला आहे. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू भक्कमपणे मांडली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड .आनंद गिराम यांनी मदत केली.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)