भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी.ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलं आहे. या नामकरणाचा सोहळा तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
धाराशिव : तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील (Rana patil) यांना भर स्टेजवर रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. तुळजापूर शहरात सुरू असलेल्या एका कार्यक्रमात हुंदके देत आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे, व्यासपाठीसह समोरील उपस्थितांमध्येही भावूक वातावरण पाहायला मिळालं. आमदार राणा पाटील हे भाजपचे विद्यमान आमदार असून ते तुळजापूर विधानसभा (Tuljapur) मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकांत महायुती व महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाल्याने, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक महायुतीमधील (mahayuti) नेत्यांचाही विरोध आहे. त्यातच, गेल्याच आठवड्यात एका कार्यक्रमात स्थानिक काँग्रेस नेत्यासमवेत त्यांची वादावादी झाली होती. तर, धाराशिव जिल्ह्यात पाटाली विरुद्ध निंबाळकर हा राजकीय वाद सर्वश्रूत आहे.
तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी.ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलं आहे. या नामकरणाचा सोहळा तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील आणि आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. त्यावेळी, आमदार राणा पाटील हुंदके देऊन रडल्याने कार्यक्रमात अनेकांचा कंट दाटला होता. विशेष म्हणजे, आवंढा गिळत त्यांनी भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भाषण करताना रडू आवरता आलेच नाही. त्यानंतर, त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे, कार्यक्रमस्थळी कमालीची शांतता पसरली होती.
दरम्यान, यापूर्वीही आमदार राणा जगजीतसिंह पाटील भर सभेत भावूक झाले होते, भावना अनावर झाल्याने त्यांनी भाषण मध्येच थांबवत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. गतवर्षी संवाद मेळाव्यात बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
लोकसभेला अर्चना पाटील यांचा पराभव
राणा जगजीतसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर महायुतीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकीत राणा जगजीतसिंह पाटील हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र असून धाराशिव जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत.