अजित पवारांचा दम, संग्राम जगतापांच्या डोक्यावरील भगवी टोपी गायब; माध्यमांच्या प्रश्नावर काय म्हणाले आमदार?
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज हिंदू जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संग्राम जगताप यांनी भाषण केलं, आंदोलनही संपलं.

अहिल्यानगर : राज्यातील काही जिल्ह्यात सध्या हिंदू जनआक्रोश सभांचं आयोजन करण्यात आलं असून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) हेही या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील हिंदू जनआक्रोश आंदोलनात भाषण करताना संग्राम जगताप यांनी थेट दिवाळी खरेदी फक्त हिंदूंकडून करा, असे म्हणत मुस्लिम समाजाविषयाची आपला रोष व द्वेष व्यक्त केला होता. त्यानंतर, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर, अजित पवारांनी संग्राम जगताप यांनाच चांगलाच दम भरला, तसेच पक्षाने कारणे दाखवा नोटीसही बजावली. त्यानंतर, संगमनेर (Ahilyanagar) येथील आंदोलनात आमदार जगताप यांनी यु टर्न घेतल्याचं दिसून येत आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज हिंदू जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संग्राम जगताप यांनी भाषण केलं, आंदोलनही संपलं. मात्र, आ. जगताप यांनी आंदोलनानंतर माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संग्राम जगताप यांनी भाषणात वादग्रस्त बोलणं टाळले. तर, माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीससंदर्भात प्रतिक्रिया मागितली असता एकही शब्द न बोलता ते अहिल्यानगरकडे निघाले. आजच्या सभेत संग्राम यांच्या डोक्यावरील भगवी टोपीही गायब झाल्याचं दिसून आलं, त्यांनी भगवी टोपी न घालताच भाषण केल्याची चर्चाही येथील आंदोलकांमध्ये होत आहे.
संग्राम जगताप 2029 मध्ये भाजपमध्ये? (Sangram jagtap in bjp)
दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, असे वक्तव्य केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यावर अजित पवारांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. संग्राम यांच्या वडिलांचा दाखला देत त्यांना खडे बोल सुनावले होते, तसेच पक्षाने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तर, आमदार रोहित पवारांनीही त्यांच्यासंदर्भात भाकीत केलं होतं. संग्राम जगताप 2029 साली राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतील असे वाटत नाही. आगामी काळात ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील. संग्राम जगताप पक्षाच्या प्रमुखांचे देखील ऐकत नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे, असे सध्या दिसत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
























