![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Terna Dam Water Storage : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक
Terna Dam Water Storage: अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
![Terna Dam Water Storage : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक Terna Dam Water Storage 27 percent water storage in Terna Dam which supplies water to Osmanabad city Terna Dam Water Storage : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/d30b26ea211ba236f016d9e306d5f3991689491897793737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Terna Dam Water Storage: जून महिना कोरडा गेल्याने आणि जुलै महिना अर्धा सरला असतांना देखील मराठवाड्यातील बहुतांश भागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातल्या त्यात उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा (Water Storage) करणाऱ्या येथील तेरणा मध्यम प्रकल्पात (Terna Dam) सद्यस्थितीत केवळ 27.60 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
आधीच मान्सून उशिरा दाखल झाला असताना, जुलै महिन्याची 15 तारीख उलटली तरी अद्याप जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक ठिकाणी खरीप पेरणी खोळंबली असून, झालेली पेरणीही संकटात सापडली आहे. लवकर जोरदार पाऊस झाला नाही तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. अशातच जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे. ज्यात धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातही केवळ 27.60 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर सध्या या धरणात 25.180 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
उस्मानाबाद शहरात पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता
मागील चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी पाहायला मिळाली. गेल्यावेळी देखील उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे मागील तीन वर्षे तेरणा धरण शंभर टक्के भरले होते. याचा फायदा असा झाला की, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला. यामुळे परिसरात मागील चार वर्षांत मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली होती. मात्र यावर्षी पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अपेक्षेप्रमाणे एकही चांगला पाऊस झाला नाही. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकली नाही. जर पुढे परिस्थिती अशीच राहिल्यास उस्मानाबाद शहरात पाणीप्रश्न निर्माण होवू शकतो.
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
उस्मानाबाद जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र मागील तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे उत्पन्न देखील वाढले होते. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. तर ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून, जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना याच मोठा फटका बसणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
दुष्काळाचे सावट! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध; परिस्थिती गंभीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)