एक्स्प्लोर
Advertisement
निवडणुकीच्या आधी जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली : धनंजय मुंडे
भाजपा सत्तेवर येणार असं वाटल्यामुळं जे भाजपाच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी बीडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
बीड : एकदा चक्र फिरलं की सगळं बिघडतं. अनेकांना वाटतं होतं भाजपा सत्तेवर येणार. तसं वाटल्यामुळं जे जे भाजपाच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली आहे, असं वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. ते बीड शहरात यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारांची भावना होती की एक पक्ष बाजूला ठेवा. चार पाच पक्ष एकत्रित या आणि सत्ता स्थापन करा पण भाजपला बाजूला ठेवा. तुमच्या भावनेतून निर्माण झालेलं हे सरकार आहे. म्हणून तुमच्या भावना हे महाविकास आघाडीचे सरकार कधीही दुखावणार नाही. बीड जिल्हा मागासलेला आहे. तो कलंक कधीच आपल्याला पुसता आलेला नाही. सत्तेच्या या पाच वर्षात मागासलेपणाचा कलंक पुसून काढू असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं.
ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषीत केली आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 जानेवारीपर्यंत आपले कर्जखाते आधार संलग्न करुन घ्यावे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत व वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
मुंडे म्हणाले की, जिल्ह्याला विकासाच्या नवीन पर्वाकडे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सैन्यदल भरतीचा लाभ घेऊन देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंदु मिल येथील स्मारकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एकूण उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून त्यांनी राज्य शासनाचे विशेष आभार व्यक्त केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement