धक्कादायक! भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून ‘समाजसेवका'ची काढली धिंड; चपलेने मारहाणही केली
Aurangabad Crime News : या प्रकरणी परस्परविरोधी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने एका समाजसेवकाला महिलांनी चपलेने मारहाण केली आहे. एवढंच नाही तर ‘समाजसेवका'ची धिंड देखील काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तर या प्रकरणी परस्परविरोधी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बापू शांताराम गवळी (वय 34 वर्ष) असे मारहाण करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बापू शांताराम गवळी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सरपंच सना अस्लम शेख आणि माजी सरपंच विनायक सोनवणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण, राशनचा काळाबाजार या संदर्भात गवळी यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित राशन दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच, सरपंच सना शेख यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने, त्याची देखील तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे याचा राग आल्याने काही महिलांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला करत त्यांना मारहाण केली. पोलीस ठाण्यापर्यंत त्यांची धिंड काढण्यात आल्याचं गवळी यांनी म्हटले आहे.
25 जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गवळी एका जनरल स्टोअरमध्ये बसले होते. दरम्यान, याचवेळी उषाबाई विनायक सोनवणे, सीमा अमोल सोनवणे, मीराबाई रामलाल पवार, उषाबाई, वंदना प्रभाकर पवार, सुनिता कृष्णा गायकवाड, रेखा प्रकाश पवार, संगीता पुंडलिक काकडे, कविता संजय पवार, लताबाई सोनवणे, रेखाबाई गायकवाड ,सुमित्रा बनकर आणि इतर पुरुष अशा 14 ते 15 जणांनी अचानक येऊन गवळी यांच्यावर हल्ला केला. त्यांची कॉलर पकडून, शिवीगाळ करत चपलांनी, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली, असल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे. यावरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात 15 महिलांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
परस्परविरोधी गुन्हा दाखल....
तर याच प्रकरणात बापू शांताराम गवळी यांच्या विरोधात मिराबाई रामलाल पवार (वय वर्षे 40 रा. मकरणपूर) यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू शांताराम गवळी यांना 'तू माझ्या नवऱ्याला का मारतो' असे विचारले असता, त्यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बापू गवळी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :