Crime News : महिलेवर अत्याचार करून उकळले दोन लाख रुपये; गर्भपात करण्यासाठी भाग पाडलं
Chhatrapati Sambhaji Nagar : आरोपी तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज महानगर परिसरातील एका 32 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे आरोपीने अत्याचार केलेल्या पीडित महिलेकडून दोन लाख रूपये उकळत तिला गर्भपात करण्यासही भाग पाडलं. त्यामुळे आरोपी तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भगवान आदमाने (रा. चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाळूज परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पीडित महिलेचे सचिन भगवान आदमाने याच्यासोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, सचिनच्या नातेवाइकांनी तिचे लग्न दुसऱ्यासोबत दहा वर्षांपूर्वी करून दिले. पीडीत महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होऊ लागल्याने एक मुलगा झाल्यानंतर ती विभक्त होऊन शहरात राहू लागली. दरम्यानच्या काळात सचिनचाही विवाह होऊन तोही पत्नीपासून वेगळा राहत होता.
अखेर महिला पोलिसात पोहचली...
दरम्यान, सचिनने सतत महिलेसोबत घरी जाऊन जवळीक वाढवून संबंध प्रस्थापित केले. अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. यामुळे महिला चार वर्षांपूर्वी वाळूज महानगर परिसरात घर खरेदी करून मुलासह राहू लागली. मात्र, सचिन हा तेथेही येऊन तिच्यावर बळजबरी करू लागला. लॉकडाऊनपूर्वी सोबत राहत असताना सचिनने महिलेकडून व्यवसाय करण्याच्या नावाखाली वेळोवेळी दोन लाख रूपये उकळले. यानंतर सचिनने तिला मारहाण करून चाकूने वार केले. त्यावेळी महिलेने वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी बालविवाह रोखला...
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी एक अल्पवयीन लग्न रोकला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडी परिसरातील एका ठिकाणी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात येत असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनवर मिळाली होती. त्यानंतर याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिता फासाटे यांच्या दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत बालविवाह रोखला. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. तसेच मुलीच्या आईला समज देऊन, लग्न लावणार नसल्याचे लेखी घेण्यात आले. तर आपल्या मुलीचे वय 18 वर्षे होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना लेखी लिहून दिले. तर चाइल्ड हेल्पलाइन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखता आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
शौचालयामध्ये जाण्याच्या कारणावरून दोन गट आपसात भिडले; वैजापूर शहरात तणावाचं वातावरण