Rohit Pawar : ईडीच्या जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवारांची कन्नड साखर कारखान्याला भेट; कामगारांशी संवाद साधणार
Rohit Pawar visit to Kannad Sugar Factory : ईडीच्या कारवाईनंतर स्वतः रोहित पवार आता या कारखान्याला भेट देण्यासाठी पोहचले आहेत.
Rohit Pawar visit to Kannad Sugar Factory : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रोमार्फत (Baramati Agro) चालवण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड साखर कारखान्यावर (Kannad Sugar Factory) चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर आज त्याच कारखान्याला भेट देण्यासाठी रोहित पवार कन्नडला पोहचले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचे हेलिकॉप्टर कन्नडमध्ये पोहचले आहे. या भेटीदरम्यान रोहित पवार हे ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.
कन्नड येथील बारामती ॲग्रो युनिट 2 हा साखर कारखाना सक्त वसुली संचालनालयाने (इडी) जप्त केल्याची बातमी पसरल्याने खळबळ उडाली. मात्र, अद्याप कारखान्याचे ऊस गाळप सुरळीतपणे सुरु आहे. तर, “ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून, याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर स्वतः रोहित पवार आता या कारखान्याला भेट देण्यासाठी पोहचले आहेत.
काय आहे या कारखान्याचा इतिहास?
कन्नड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम तत्कालीन संचालक मंडळाने 2001 मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत माजी आमदार तेजस्वी जाधवांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त करून हा कारखाना अवसायनात गेला. या कारखान्यावर 2007 मध्ये माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवसायक मंडळ आले. त्यांनी कारखाना सुरु केला, मात्र तो चालु शकला नाही. त्यानंतर पुन्हा निवडणुक होऊन आलेल्या संचालक मंडळाने काही साखर विक्री करून बँकेची काही रक्कम भरली. मात्र कारखान्यावरील कर्जामुळे अवसायनात गेल्यानंतर शिखर बँकेने ऑक्टोबर 2012 मध्ये कारखान्याच्या ताब्यातील 161 एकर जमिनीसह विक्री केला. हा कारखाना आमदार रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रोने 50 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केला. हा कारखाना विक्री करतांना घोटाळा झाल्याचे आरोप कामगार संघटनेने केले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी सक्त वसुली संचालनालयाच्या पथकाने कारखान्यावर धाड टाकुन काही कागदपत्र चौकशी साठी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. बारामती ॲग्रो युनिट 2 हा साखर कारखाना सक्त वसुली संचालनालयाने जप्त केल्याचे सांगितले जातय. पण कारखान्याच्या गळीत हंगामावर आणि कार्यप्रणालीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :