Marathwada Water crisis: मराठवाड्यात भीषण 'पाणीबाणी'; सात जिल्ह्यात 1 हजार 706 टँकर्सने तहान भागवण्याची वेळ
Marathwada Water Crisis: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर पाहायला मिळतात.
छत्रपती संभाजीनगर: राज्यात वळीव पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 25 टक्के पाणीसाठा आहे.मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात तब्बल 1 हजार 706 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागातलं जीवन पाणी या दोन शब्दाभोवती फिरतात. कारण गावागावात सध्या महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी आहे. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याविना शेततळे पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील स्त्रिया दिवसभर पाणी कसे पुरवायचं याचे नियोजन करताना पाहायला मिळतात.
मराठवाड्यातील टँकर संख्या
- छत्रपती संभाजीनगर : 656 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- जालना : 488 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- बीड : 382 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- परभणी : 5 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- नांदेड : 16 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- धाराशिव : 131 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- लातूर : 21 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
आठ दिवसाला एक टँकर
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर पाहायला मिळतात. पैठण तालुक्यातील 124 घर असलेला अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येतं. या गावाच्या घराघरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. या ड्रमची संख्या जवळपास 500 आहे. ड्रम चोरीला जाऊ नये म्हणून रूमवर प्रत्येकाने नाव टाकले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याची पाईपलाईन पडली पंजाबीतून पाणी येतं तीच कोरडीठाक आहे .
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ
धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ 23.43 टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत 35 टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पिण्याच्या पाण्याने महाराष्ट्र बेहाल
राज्यात गेल्या आठवडाभरात वळीव पाऊस झाल्याने शेतीच्या पाण्याचे प्रश्न काही प्रमाणात कमी झाला असला, तरी पिण्याच्या पाण्याने महाराष्ट्र बेहाल झाला आहे. राज्यातील विविध शहरांसह गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा आता तळ गाठत असून मन्सूनचा पाऊस सुरू होऊन पाणी पिण्यायोग्य होण्यास दीड महिन्याहून अधिक कालावधी आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा जवळपास संपल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता प्रशासन काय उपाय करणार, हे पाहावे लागेल.
हे ही वाचा :