Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडी पाणी प्रश्न पेटणार? वरील धरणातून पाणी सोडण्याची मराठवाड्यातील आमदारांची मागणी
Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडीत 47 टक्के पाणीसाठा असून, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्के साठा आहे.
Jayakwadi Dam Water Issue : मराठवाड्यात जेव्हा-जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी नेहमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (Marathwada) पाण्याचा वाद पाहायला मिळतो. यंदा देखील असाच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, जायकवाडीत 47 टक्के पाणीसाठा असून, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्के साठा आहे. तर 17 ऑक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पाण्याचा हिशेब झाल्यानंतर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी (Jayakwadi Dam) प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया देखील तातडीने करावी, अशी मागणी मराठवाड्यातील आमदारांकडून आत्तापासूनच करण्यात येत आहे.
आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पत्र पाठवून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठकीनंतर मराठवाड्याच्या वाट्याला येणारें पाणी तत्काळ सोडण्याची मागणी आमदार चव्हाण आणि बंब यांनी केली आहे. सध्या गोद्वारी नदीपात्रात पाणी असून, त्यामुळे आता पाणी सोडले तर पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच जास्तीत जास्त पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचेल, असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले आहे. त्यामुळे, बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर आता वरील धरणातून पाणी सोडले जाणार का? याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
सतीश चव्हाण यांचे पत्र?
आमदार सतीश चव्हाण यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, "सन 2023-24 या वर्षीच्या मराठवाड्याच्या विविध भागात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिति व कोरडे पडलेले जलसाठे यामुळे मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई असल्याने मोठा जनक्षोभ निर्माण होत आहे. या विषयी आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठवाडा पाणी परिषदेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मला प्राप्त झाले आहे.
मराठवाड्यातील पूर्ण असलेल्या पाटबंधारे योजनांचे नियोजन आपल्या अधिपत्याखाली आहे. या वर्षी जायकवाडी प्रकल्पात देखील कमी पाणीसाठा झाला आहे. सबब, महाराष्ट्र जलसंपत्ति नियम प्राधिकरण नियम क्र. 12 (क) मधील तरतुदीनुसार15 ऑक्टोबर अखेर जायकवाडी प्रकल्प व त्याच्या पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पांच्या निर्मित जलसाठयाचा एकत्रित आढावा घेऊन समन्यायी पद्धतीने या धरणातील पाणीसाठयाची टक्केवारी समान राहील असे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावे, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणावरील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले, हजारो मच्छिमार रस्त्यावर