'आता सुट्टी नाही, 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही'; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Manoj Jarange : जालना येथील आंतरवाली सराटीमधील सभेनंतर पहिल्यांदाच जरांगे यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचे आता 8 दिवस शिल्लक राहिले आहे. सरकराने आमच्याकडून 40 दिवस घेतले असून, या चाळीस दिवसांत त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिला आहे. जालना येथील आंतरवाली सराटीमधील सभेनंतर पहिल्यांदाच जरांगे यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात विरोधकांनी उभं केलय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं. तर, सरकारने आमच्याकडे चाळीस दिवस घेतले आहे. त्यामुळे आरक्षण द्या, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला 5000 पानांचा आधार मिळाले असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. 40 दिवसांची मुदत संपल्यावर 24 तारखेनंतर होणार आंदोलन देखील शांत पद्धतीनेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
सरकार काय करतंय ते त्यांचे त्यांनाच माहित...
सरकारला वेळ नाही ते बिझी असतं, काय करतात ते त्यांचे त्यांनाच माहित आहे. राज्यातली जनता काय ओरडते, बोंबलते किंवा सामान्य मराठा आंतरवालीत आला होता, त्याचं त्यांना काही देणं घेणं नाही. जनतेचे देणे घेणे नाही. आम्हाला आता त्यांनी विचारू नये. 40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण द्यावे, असे जरांगे म्हणाले.
विजय वड्डेटीवारांवर प्रतिक्रिया...
विजय वड्डेटीवारांनी एकीकरण कराव. सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. सगळ्या जनतेला न्याय द्यायचं हे त्यांचं काम आहे. जनतेचा आवाज व्हायचं काम विरोधी पक्षनेत्याच असतं. ती शक्ती एका जातीकडे जात असेल तर हे त्यांना शोभत नाही. ते आमच्याकडे आले होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या हे सांगणारे धाडसी माणूस तेच होते. त्यामुळे तुम्ही सरकारला धारेवर धरा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. तसेच, भाजपाचे ओबीसी सेल आणि विरोधी पक्ष आज एकत्र बसलेत. मग, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ म्हणत सर्वपक्षीय ठराव का घेतला होता? असेही जरांगे म्हणाले.
आमच्या ताटात माती टाकू नका...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणतात, ते देणारच. तसेच सत्ताधाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. आंदोलकाची भूमिका अशी असते की, जो कोणी आलं त्याच्या पाठिंबा स्वीकारायचा. ओबीसी बांधवांना माझी विनंती असून, आमच्या गोरगरिबांचा प्रश्न आहे. आमच्या ताटात आणण्यासाठी आम्हाला साथ द्या, माती टाकू नका. आम्ही तुमचं काही केलं नाही. या नेत्यांचं ऐकू नका, राज्य आपला आहे. तसेच सदावर्ते यांच्यावर मला काहीच बोलायचे नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही...
छगन भुजबळ यांना कोण धमक्या देतात, तो काय लहान माणूस आहे. धमक्या द्यायला कोणाला वेळ आहे. जर कोणी दिले असेल तर त्यांचं मी समर्थन करणार नाही. त्यांच्या विचाराला विरोध आहे, पण व्यक्तीला विरोध नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला तर तेच काय कोणीही असो त्यांना सुट्टी नाही, असेही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
सभा नसून जत्रा म्हणणाऱ्या सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; धाराशिव पोलिसांत तक्रार