सभा नसून जत्रा म्हणणाऱ्या सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; धाराशिव पोलिसांत तक्रार
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी भव्य सभा घेतली. दरम्यान, याच सभेतून त्यांनी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर टीका करत समाचार घेतला होता. तर, जरांगे यांच्या टीकेला उत्तर देतांना आंतरवालीत झालेली सभा नसून जत्रा होती अशी टीका सदावर्ते यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी सभा झाली. याच सभेतून त्यांनी काही राजकीय नेत्यांवर टीका केली होती. सोबतच गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील टीका केली होती. त्यामुळे, सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका करतांना, "जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवरून आता मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाजामध्ये संतापाची लाट
यावेळी पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला व आपल्या एकजुटीतून मराठा समाजाच्या वेदना दिसुन आल्या. या सभेतील गर्दी ही कुठल्याही कॅमेऱ्यात व छायाचित्रातही मावनार नाही इतकी प्रचंड होती. परंतु, गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने या सभेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी ही सभा नसून जत्रा आहे असे वक्तव्य केल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून तातडीने सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
तर, कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते यांच्या वक्तव्याच्या विरोधात कळंब पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. तसेच तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
सदावर्ते नेमकं काय म्हणाले होते?
“जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: