(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis : अर्थ खात्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मार्ग निघेना, आता विरोधी पक्षनेते दानवेंनीच सुचवला पर्याय
Maharashtra Political Crisis: खातेवाटपाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे दिसत आहे.
Maharashtra Political Crisis: सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटपावरुन नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून अर्थमंत्री पदावर दावा केला जात असून, त्याला शिंदे गटाचा (Shinde Group) मात्र विरोध आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी चक्क विरोधी पक्षनेते अंबादास (Ambadas Danve) यांनीच सत्ताधाऱ्यांना एक पर्याय सुचवत खोचक टोला लगावला आहे."अर्थ खात्यावरून चाललेल्या गोंधळावरून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देऊन हा तिढा सोडवावा", असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने युती करण्यासाठी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे ते आता त्यांना काम करून देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारत खोचक टोला लगावला आहे.
अजित पवारांना दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय
मंत्रीपद गळ्यात पडेल या आशेने डोळे लावून बसलेल्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, अस चित्र सध्या दिसत असल्याचं दानवे म्हणाले. जे सोबत आले आहेत त्यांना शिंदे फडणवीस सरकार न्याय देऊ शकले नाहीत मग अपक्षाला न्याय देणं तर लांबच आहे. अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते. मात्र आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका दानवे यांनी अजित पवारांच्या दिल्लीवारीवर केली आहे.
बच्चू कडू यांच्यावर टीका...
पुढे बोलताना दानवे म्हणाले, मंत्रीपद त्याग केलं अशी भूमिका आज अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडली. शिंदे फडणवीस मंत्रिपद घ्या म्हणून मागे लागलेत का?, ते देत नाही. मग त्याग कस करताय? या सर्व बनावट गोष्टी असल्याचे दानवे यांनी म्हटले. तर राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राने ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनात गंगेत वाहिलेल्या प्रेतांबाबत जाब विचारावा. पंतप्रधान फंडाबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारावे, असेही दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: