धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पत्नीसह चार महिन्यांच्या बाळाला घेऊन गेल्याने होता तणावात
Chhatrapati Sambhajinagar : सासरची मंडळींनी घरी येऊन तरुणाला शिवीगाळ करत पत्नीसह चार महिन्यांच्या बाळाला घेऊन गेले होते.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील एम-2 भागातील उद्यान परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, सासरच्या छळाला कंटाळून प्लंबरचे काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. गुरुवारी (9 मार्च) रोजी सकाळी साडेआठदरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. सासरची मंडळींनी घरी येऊन तरुणाला शिवीगाळ करत पत्नीसह चार महिन्यांच्या बाळाला घेऊन गेले होते. त्यामुळे याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार तरुणाच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रघुनाथ जगधने (वय 23 वर्षे, रा. प्रतापगडनगर, म्हाडा कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
मृत सुनीलच्या वडिलांनी सिडको पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी सुनीलचा विवाह झाला होता. मात्र लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोच त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याला मुंबई येथे कामासाठी ये असा तगादा लावला. परंतु सुनीलला छत्रपती संभाजीनगर शहरातच चांगले काम मिळत असल्याने तो प्लंबरचे काम करुन उदरनिर्वाह करत असे. सर्व काही सुरळीत सुरु होते. दरम्यान सहा मार्च रोजी मृत सुनील आणि पत्नी निकीता यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर सासरच्या मंडळींनी सुनीलच्या घरी येऊन पत्नीसह चार महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन गेले.
अन् मृतदेह आढळून आला
सासरच्या मंडळींनी घरी येऊन पत्नीसह चार महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन गेल्याने सुनील तणावात होता. दरम्यान सुनीलने सहा मार्च रोजी सायंकाळी घर सोडले होते. त्याचा शोध घेऊनही न सापडल्याने सात मार्च रोजी सिडको पोलिसांत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 9 मार्च रोजी त्याचा मृतदेह आढळून आला.
सुसाईड नोट सापडली!
शहरातील एम-2 भागातील उद्यान परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सुनील जगधने यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी सुनीलने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून, त्याने सासू सासरे चिमुकल्या बाळासह पत्नीला घेऊन गेले असून माझा आजवर छळ करुन सतत शिवीगाळ केल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्यामुळे या प्रकरणी मृत सुनीलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: