छत्रपती संभाजीनगर राड्यातील जखमी घेत आहेत घरीच उपचार, पोलिसांनी केलं रुग्णालयात दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : पोलीस पकडतील या भीतीने जखमींकडून घरी उपचार घेतले जात आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा भागात 29 मार्च रोजी दोन गटात वाद झाला, वादाचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळमध्ये झाले. यात अनेक पोलीस जखमी झाले. तर अनेक वाहने अक्षरशः पेटवून देण्यात आले. अशावेळी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान याच राड्यात आणि पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले व्यक्ती घरीच उपचार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस पकडतील या भीतीने जखमींकडून घरी उपचार घेतले जात आहेत. तर पोलिसांनी अशाच एकाला ताब्यात घेऊन, पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अर्शान मुबिन काझी (वय 21 वर्षे, रा. गणेश कॉलनी) असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
राम नवमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 29 मार्च रोजी किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला आणि दगडफेक सुरु झाली. जमावाने जाळपोळ सुरु केली. पोलिसांच्या अनेक वाहने पेटवून देण्यात आली. तर यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकमध्ये अनेक पोलीस जखमी झाले. दरम्यान मोठा जमाव राम मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. जर जमाव मंदिरात घुसला असता तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला रबरी बुलेट फायर केल्या. पण त्यानंतरही जमाव नियंत्रणात येत नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व्हिस पिस्टलमधून जिवंत काडतुसांनी सुरुवातीला हवेत आणि त्यानंतर कंबरेच्या खाली फायर केले. ज्यात काहीजण जखमी झाले होते. परंतु जखमी झालेले लोक घरीच उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं...
किराडपुरा भागात राडा करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु असून, यासाठी 22 वेगवेगळे पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान गणेश कॉलनी परिसरात राहणारा एक तरुण या राड्यात जखमी झाला असून, घरीच उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी अर्शान मुबिन काझी याच्या घरी जाऊन चौकशी केली असता, तो जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली गोळी आरपार निघून गेली असून, तो घरीच उपचार घेत होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यास पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच तो त्या रात्री घटनास्थळी होता का? तिथे तो काय करत होता? याचा तपास देखील पोलीस करत आहे.
घरीच उपचार घेत असल्याचा अंदाज
किराडपुरा भागात झालेल्या राड्यात अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र पोलीस आपल्याला आरोपी करतील या भीतीने अनेक जण रुग्णालयात न जाता थेट घरीच उपचार घेत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी केली जात असून, ओळख पटलेल्या लोकांनाच ताब्यात घेण्यात येत आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांची ओळख पटली असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अनेक जण शहर सोडून फरार झाले आहे. त्यामुळे काही पथक इतर जिल्ह्यात जाऊन त्यांना ताब्यात घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई; 20 फुटांचा रस्ता झाला होता तीन फुटांचा