छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई; 20 फुटांचा रस्ता झाला होता तीन फुटांचा
Chhatrapati Sambhaji Nagar : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हडको आणि सिडको भागातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) अतिक्रमण विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा शहरातील टीव्ही सेंटर भागातील संजय गांधी भाजी मार्केट येथे एकूण 20 अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हडको आणि सिडको भागातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरातील टीव्ही सेंटर येथील संजय गांधी भाजी मार्केटमधील नागरिकांनी प्रवेशद्वारा मध्येच अतिक्रमण केले होते. त्यामुळे जवळपास 25 फुटाचा रस्ता प्रस्तावित असताना अतिक्रमण धारकांनी तो फक्त तीन फूट रस्ता शिल्लक ठेवला होता. त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी या सर्व अतिक्रमणमधील गाळेधारकांना तोंडी सूचना देऊन सर्व अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भाजीपाला विक्रेत्यांचे कोणतेही नुकसान होऊ नयेत म्हणून, त्यांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सूचना देऊनही एकाही भाजी विक्रेत्यांनी आणि टपरीधारकाने, दुकानदारांनी आपले अतिक्रमण काढले नव्हते.
वीस फुटाचा रस्ता मोकळा करण्यात आला
सूचना देऊनही अतिक्रमण काढली जात नसल्याने आज (11 एप्रिल) महापालिकेचं अतिक्रमण विभागाचे पथक संजय गांधी भाजी मार्केटमध्ये दाखल झाला. यावेळी सर्वप्रथम जेसीबीच्या साह्याने मुख्य प्रवेशद्वारा लगत असलेले चार लोखंडी टपऱ्या निष्काशीत करून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर रस्त्यामध्ये भाजी विक्रेत्यांनी तीन बाय सहा असे दहा ओळी तयार करून रस्ता तीन फुटाचा केला होता, ते अतिक्रमण निष्काषित करण्यात आले. जय बालाजी भाजी सेंटर, भारत भाजी सेंटर, अथर्व फळे भाज्या विक्री केंद्र यांचे दोन दुकाने निष्काशीत करून रस्ता पूर्ण वीस फुटाचा मोकळा करण्यात आला. या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या अतिक्रमण धारकांच्या तीन टपऱ्या आणि शेड काढण्यात आले.
अन् गाळेधारकांचा विरोध मावळला
दरम्यान कारवाई सुरु असताना काही नागरिकांनी प्रथम त्याला थोडा विरोध केला, परंतु अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांनी गाळेधारकांशी चर्चा करून, त्यांचे रीतसर अर्ज घेऊन त्यांना कुठे पर्यायी जागा देता येतील का? याबाबत मनपा आयुक्त यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गाळेधारकांचा विरोध मावळला आणि पुढील कारवाई करण्यात आली.
उद्या बांधकामावर होणार कारवाई...
तर याच भाजी मार्केटमध्ये इतर चार दुकानदारांनी दहा बाय दहा या आकाराचे दुकाने रोडवर बांधलेली आहे. त्यांना देखील आज सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कच्च्या भाजीपाला ठेवलेला असल्याने उद्या त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भाजी मार्केट अंतर्गत जे दहा फुटाचे रस्ते आहेत, त्यावर अनेक लोकांनी टपऱ्या टाकून रस्ता लहान केला आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांना पायी चालण्यासाठी त्रास होतो. याबाबत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा अतिक्रमण काढल्याने आनंद व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! रेल्वे स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये मिळतायत खराब अन्नपदार्थ; असा झाला भांडाफोड