कुठे वसुली सुरु, तर कुठे कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याने टोल बंद; समृद्धीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी
Samruddhi Mahamarg : गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने टोल नाका बंद पाडल्याचे समोर आले.
Samruddhi Mahamarg : मोठा गाजावाजा करत शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबरला उद्घाटन केले. ज्यात सुरुवातीला नागपूर ते शिर्डी 480 किलोमीटरचा आणि दुसऱ्या टप्प्यात 80 किलोमीटरचा रस्ता सुरु करण्यात आला. पण गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे हा महामार्ग सतत चर्चेत पाहायला मिळत आहे. आधी अपघात, त्यानंतर महामार्गावरील पोलिसांची वसुली आणि आता कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने वेळोवेळी टोल बंद होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने टोल नाका बंद पाडल्याचे समोर आले. तर गुरुवारी (1 जून) रात्री देखील असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील जांबरगावाच्या टोल प्लाझावर (Toll Plaza) पाहायला मिळाले.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही दिवसांपासून थकले आहेत. काहींचे दोन तर काहींचे चार महिन्यापासून वेतन झाले नाहीत. अनेकदा मागणी करुन देखील संबंधित कंपनीकडून वेतन वेळेवर दिले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून देण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून आणि वेतन मिळत नसल्याने गुरुवारी रात्री 40 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला. त्यामुळे टोल प्लाझा बंद पडला. दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या. शेवटी दुसऱ्या शिफ्टमधील इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आणि टोल सुरु करण्यात आले. मात्र यासाठी बराच वेळ लागला. विशेष म्हणजे वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याची ही दीड महिन्यातील तिसरी वेळ आहे.
यापूर्वी देखील दोन वेळा बंद पाडला टोल...
समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही दिवसांपासून होत नसल्याने त्यांच्यात मोठा संताप आहे. विशेष म्हणजे यासोबतच टोल प्लाझावर जेवण पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे देखील बिल थकल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी टोल प्लाझा बंद पाडला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला होता. दरम्यान त्यानंतर देखील एकदा हाच टोल प्लाझा वेतनाच्या मागणीसाठी बंद करण्यात आला. तर आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा भोंगळ कारभार सतत समोर येत आहे.
पोलिसांकडून वसुली
समृद्धी महामार्गामुळे कमी वेळेत सुखकर प्रवास करण्याचा हेतू ठेवत सरकारने हा महामार्ग तयार केला. पण सुरुवातीला एकामागून एक होणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग चर्चेत आला. त्यानंतर आता याच महामार्गावर पोलिसांकडून जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून वसुली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याच वसुलीचा एक व्हिडिओ ट्वीट करत सर्व प्रकार समोर आला होता. त्यामुळे यातून पोलिसांची समृद्धी समोर आली होती.
इतर ममहत्वाच्या बातम्या:
Police Viral Video : आला की घाल खिशात! पोलिसांच्या वसुलीचा व्हिडीओ अंबादास दानवेंकडून ट्वीट