Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये चाललं काय? पोलिसांवर चार दिवसांत तीन हल्ले; गुन्हेगारांचे धाडस वाढल्याची चर्चा
Chhatrapati Sambhaji Nagar : आता टी.व्ही. सेंटर परिसरात बार बंद करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचे कपडे फाडण्यात आल्याचं प्रकार समोर आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) उद्योजकांना ठरावीक राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल केले जात असल्याचे प्रकार वाढले असल्याची घटना समोर आली आहे. आता पोलिसांवर चार दिवसांत तीन हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना थेट न्यायालयाच्या आवारात मारहाण केली. त्यानंतर छावणीत घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आता टी.व्ही. सेंटर परिसरात बार बंद करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचे कपडे फाडण्यात आल्याचं प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये चाललं काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास चालकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याची वर्दीही फाडण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास सूर्या रेस्टॉरंट अॅण्ड बार, टी. व्ही. सेंटर याठिकाणी घडली. विशेष म्हणजे, मागील चार दिवसांमध्ये पोलिसांवर हात उगारल्याची ही तिसरी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. मनीष कृष्णा राऊत (रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी), संतोष सुधाकर चौकडे (रा. धनगर गल्ली, हर्सुल) असे आरोपींचे नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
सिडको पोलिस ठाण्याचे अंमलदार विशाल पवार हे पोलिसांच्या गाडीत सहकाऱ्यासह अस्थापना बंद करत होते. टी. व्ही. सेंटर परिसरात रात्री सव्वाअकरा वाजता सूर्या रेस्टॉरंट ॲण्ड बारच्या सुरक्षारक्षकाला बार बंद करण्याचे सांगून पोलिसांची गाडी पुढे गेली. त्यानंतर पावणेबारा वाजता पोलिसांची गाडी परत आल्यानंतर त्याठिकाणी बार सुरूच असल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांनी हटकल्यानंतर आरोपी मनीष राऊत व संतोष चौकडे हे बाहेर आले. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. पवार यांच्या अंगावर धावून जात शर्टाची कॉलर पकडून जोरात ओढले. यात त्यांच्या गणवेशाचे बटन, लाईनयाड व शिट्टी तुटली. त्यानंतर झटापट करून लाथदेखील मारली. दोन पोलिस कर्मचारी असताना हॉटेल चालकाची एवढी मजल गेली. ही घटना समजल्यानंतर सिडको ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: