Chhatrapati Sambhaji Nagar : चौकशीसाठी आलेल्या पोलिसावर चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांवर हल्ला
Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) दोन दिवसात सलग दोन घटनांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तर 9 मे रोजी एका अदखलपात्र गुन्ह्यात घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर चक्क चाकू हल्ला (Knife Attack) करण्यात आल्याचं प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या घटनेच्या एक दिवसाआधी न्यायालयाच्या परिसरात काही आरोपींनी जेलमध्ये तंबाखू, सिगारेट घेऊन जाण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला चढविला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी केशव काळे हे गुन्ह्यातील घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तक्रारदार राजू मित्रे व त्यांच्या पत्नीकडे काळे हे चौकशी करीत असतानाच त्यांचा जावई रोहन नारायण येरले (रा. गवळीपुरा) तिथे आला. यावेळी तो शिवीगाळ करू लागला. त्यामुळे काळे यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने 'आमचे फॅमिली मॅटर आहे. तुम्ही मध्ये येऊ नका,' असे बोलून चाकू काढून काळे यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, काळे यांनी चपळाई दाखवत येरले यास पकडत, पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांना कळविले.
शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
काळे यांच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी तात्काळ चार पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत रोहनला काळे यांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी त्याला ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालय परिसरातच पोलिसांवर हल्ला
तर दुसऱ्या घटनेत छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी राडा घालत पोलिसांवर हल्ला केला. जेलमध्ये तंबाखू, सिगारेट घेऊन जाण्यास पोलिसांनी विरोध केल्याने या आरोपींनी न्यायालय परिसरातच पोलिसांवर हल्ला चढविला. धक्कादायक म्हणजे याच आरोपींनी एका पोलिसाला चावा घेत वॉरंटदेखील फाडून टाकले. हा धिंगाणा एवढ्यावरच थांबला नाही. तर एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा न्यायालयात झालेल्या या धिंगाणा प्रकरणात शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल युवराज पवार, गणेश रवींद्र तनपुरे व ऋषिकेश रवींद्र तनपुरे अशी आरोपींची नावे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: