Chhatrapati Sambhaji Nagar : काय सांगता! जावयानं चक्क सासऱ्याचं बोट छाटलं, जिल्हा न्यायालयासमोरचं घडली घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : याप्रकरणी पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, जावयाने चक्क सासऱ्याचे बोट छाटले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा न्यायालयासमोरचं ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अजहर खान अफजल खान पठाण असे आरोपी जावयाचे नाव असून, काजी अब्दुल वाजीद अब्दुल, असे जखमी सासऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या प्रकरणात तारखेसाठी आरोपी अजहर खान आणि पत्नीसह सासरे जिल्हा न्यायालयात आले होते. दरम्यान, यावेळी न्यायालयात आलेल्या पत्नीसह सासऱ्याच्या अंगावर वाहन घालून मारण्याचा प्रयत्न अजहर खान याने केला. त्यामुळे अंगावर वाहन घालणाऱ्या जावयाचा सासऱ्याने वाहनाचा पाठलाग करत जावयाला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सासऱ्याचा हात जावयाच्या वाहानात असतानाच जावयाने धारदार शस्त्राने उजव्या हाताचे मधले बोटच कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जिल्हा न्यायालयासमोर 18 मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणी 21 मार्च रोजी रोजी गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या प्रकरणी काजी अब्दुल वाजीद अब्दुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता ते मुलीसोबत कौटुंबिक न्यायालयात तारखेसाठी गेले होते. तारीख संपल्यानंतर सायंकाळी ते मुलीसह कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर स्वतःच्या कारकडे जात होते. यावेळी जावई अजहर खान याने कोर्टातील तारखेच्या रागामुळे त्याच्याकडील कार काजी अब्दुल यांच्या मुलीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मुलीस बाजूला करीत स्वतःला वाचवले. जावई कारच्या खिडकीतून धक्का देत शिवीगाळ करीत कार घेऊन पळून जाऊ लागला. तेव्हा जावयाचा त्यांनी पाठलाग केला.
थेट सासऱ्याचे बोटच छाटले
जावयाचा पाठलाग करत असतानाच त्याची कार सिग्नलजवळ थांबली. त्यामुळे कारच्या खिडकीतून हात आतमध्ये घातला. तर जावयाने खिडकीच्या काचा लावल्या. ज्यात पाठीमागील खिडकीत त्यांचा उजवा हात अडकला. हात आतमध्ये असतानाच जावयाने धारदार शस्त्राने सासऱ्याचे उजव्या हाताचे मधले बोट कापले. त्या बोटाचे दोन तुकडे झाले. बोटातून रक्त वाहू लागल्यामुळे काजी अब्दुल रस्त्यावरच कोसळले. त्यांना मुलीने घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी जावयाविरोधात फिर्याद नोंदवली. अधिक तपास निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत. तर सासऱ्याचे बोट कापल्यानंतर जावई फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस पथक घेत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
माणुसकी हरपली! मदत सोडा अपघातात जखमी महिलेचे मंगळसूत्रही पळविले