'चोर आले 50 खोके घेऊन'! रॅपर राज मुंगासेला अटकपूर्व जामीन, अंबादास दानवेंची माहिती
Raj Mungase : शिंदे गटाचे पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी रॅपर राज मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Raj Mungase Granted Anticipatory Bail : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर '50 खोके'ची जोरदार चर्चा आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhaji Nagar) मराठी रॅपर राज मुंगसे (Raj Mungase) याने 'चोर आले पन्नास खोके घेऊन' असं रॅप तयार केला होता. विशेष म्हणजे या रॅपने सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर धुमाकूळ घातला होता. तर या रॅपमध्ये अश्लील शब्दाचा वापर केला गेल्याचा आरोप करत शिंदे गटाचे पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी रॅपर राज मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून रॅपर राज मुंगासे बेपत्ता झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर रॅपर राज मुंगासे अटकपूर्व जामीन मिळाली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.
दानवेंची फेसबुक पोस्ट...
याबाबत अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, "मराठी रॅपर राज मुंगसे याने "चोर आले 50 खोके घेऊन" हे गाण्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित त्यांच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यानंतर मी त्याला सर्व कायदेशीर मदत करत, माझे वकील शुभम काहिते यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी मंगळवारी (11 एप्रिल) रोजी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने रॅपर राज मुंगसे यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. महाराष्ट्र राज्यात सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे गुन्हा आहे. युवकांवर, कलाकारांना गुन्हा दाखल होऊन तरुणांचे भविष्य हे सरकार उद्ध्वस्त करत आहे, आम्ही यांच्या पाठीशी सर्व ताककदीनिशी उभे असू."
पोलिसांकडून सुरु होता शोध...
रॅपर राज मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, त्याला पोलिसांकडून अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पोलिसांचे वेगवेगळे पथक देखील त्याच्या शोधात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात देखील त्याचा शोध घेतल्याची चर्चा आहे. पण राज मुंगासे पोलिसांना सापडत नव्हता. तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राज मुंगासे एवढे दिवस कुठे होता, याबाबत कोणालाच माहिती नव्हती. पण त्याला जामीन मिळाला असल्याची माहिती देत, अंबादास दानवे यांनी राजसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sanjay Shirsat : बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, पाटलांनी असे वक्तव्य करू नयेत; शिरसाट स्पष्टच बोलले