मविआची वज्रमुठ अन् शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा; छ. संभाजीनगरमध्ये असा रंगतोय पॉलिटिकल ड्रामा
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात पॉलिटिकल ड्रामा रंगताना पाहायला मिळत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) तीनही पक्षाची आज एकत्र सभा होत आहे. विशेष म्हणजे अशाच सभा राज्यभरात होणार असून, पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) होत आहे. या 'वज्रमुठ सभे'ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पॉलिटिकल ड्रामा रंगताना पाहायला मिळत आहे.
ठाकरे कुटूंबाची सभेची परपंरा असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा आज (2 एप्रिल) पार पडत आहे. साधारण संध्याकाळी 5 वाजता या सभेला सुरूवात होईल. त्यासाठी दुपारी दोन वाजेपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी येण्यास सुरूवात होईल. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिसरातील वाहतूकीत देखील मोठा बदल केला आहे. तर या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली आहे. शहरातील चौका-चौकात तीनही पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहे. तर जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. तर याच सभेतून शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
भाजप-शिंदे गटाची (शिवसेना) सावरकर गौरव यात्रा
एकीकडे महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा होत असताना, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथुन या यात्रेला सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप होईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज हे मार्ग टाळा (वाहतुकीत बदल)
- दुपारी 1 ते 11 दरम्यान मिलकॉर्नर ते खडकेश्वर टि मार्गे महात्मा फुले चौक.
- आटीआय ते खडकेश्वर टि पॉईंट.
- जुनी मल्टीपर्पज शाळा ते नारळीबाग प्रवेशद्वार.
- जुबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतीक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता.
- आशा ऑप्टिकल ते मराठवाडा सांस्कृतीक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता.
असे असेल नियोजन
- माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दुपारी तीन वाजता मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगर कडे रवाना होतील.
- साडेचार वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन होऊन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत राखीव वेळ असेल.
- संध्याकाळी 7 वाजता मैदानावर दाखल होतील.
- उद्धव ठाकरेंचं 50 मिनिटांचे भाषण असण्याचा अंदाज असून, रात्री 9 वाजता विमानतळाकडे रवाना होतील.
असा असणार कडेकोट बंदोबस्त
पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दोन आयपीएस सुरक्षेच्या अनुंषगाने नियुक्त करण्यात आले आहे. उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे, आयआरबीचे समादेशक निमित गोयल यांच्यासह शहरातील तीन उपायुक्त, सहायक आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवतील. त्या व्यतिरीक्त 17 पीआय, 46 एपीआय/पीएसआय, 968 पुरूष अंमलदार तर 54 महिला अंमलदार बंदोबस्तासाठी तैणात असतील. शिवाय, 11 कॅमेऱ्यांद्वारे पोलिस मैदान व आसपासच्या परिसरावर नजर ठेवून असतील. गुन्हे शाखा, विशेष शाखेचे अधिकारी साध्या वेशात नजर ठेवून असतील. या दरम्यान शहरात देखील संवेदनशील ठिकाणी दंगा काबु पथक, केंद्रिय सुरक्षा दलाचे पथक, राज्य राखीव दलाचे पथके तैनात करण्यात आली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :