Chhatrapati Sambhaji Nagar: मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करणार
Ambadas Danve : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात हा गुन्हा दाखल करणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले आहे.
Ambadas Danve On Sanjay Shirsat : शिंदे- ठाकरे गटातील वाद काही थांबता थांबत नसून एकमेकांवर सतत टीका सुरूच आहे. दरम्यान अशाच एका टीकेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर थेट पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे. शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिरसाट यांनी केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात हा गुन्हा दाखल करणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले आहे.
आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात आपण गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती खुद्द दानवे यांनी दिली आहे. तर सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून हा गुन्हा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. शिरसाट यांचे वक्तव्य फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि क्रिमिनल लॉ मध्ये बसणारे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्तांकडे आपण तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही त्यांना आम्ही सांगणार असल्याचे दानवे म्हणाले.
महिलांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महिलांचा अपमान करणे हे एकमेव कार्य सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सुप्रिया सुळेंच्या विषय वक्तव्य करतात आणि आता संजय शिरसाट सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलतात. त्यामुळे भाजपाचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांचा अवमान करणाऱ्या मंत्री आणि आमदारांना कसं संरक्षण देतात हे यातून पुढे येत असल्याचे दानवे म्हणाले.
तानाजी सावंत यांच्यावर टीका...
दरम्यान याचवेळी अंबादास दानवे यांनी तानाजी सावंत यांच्यावर देखील टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नव्हते, तसेच अजित पवार त्रास देत असल्याचे सर्व आरोप फक्त पोकळ गप्पा होत्या. यांच्या मनातच गद्दारीचे बीज सुरुवातीपासूनच पेरलेलं होते. म्हणून तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी गद्दारी करायचं हे ठरवलं होतं. त्यामुळे अजित पवार निधी देत नव्हते, उद्धव ठाकरे भेटत नव्हते हे सगळा बकवास होता, असेही दानवे म्हणाले.
रूपाली पाटील ठोंबरेंची टीका...
दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेनी देखील संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमाताई अंधारे या रामा इंटरनॅशनलला उतरतात की ताज हॉटेलला उतरतात, त्यांच्या राहण्या खाण्याची काळजी आणि खर्च करण्यासाठी त्यांचा पक्ष अत्यंत खंबीर आहे. त्यामुळे मिंधे गटातल्या गद्दारांनी फार तर खोक्यांमधून मिळालेल्या पैशांनी गुवाहाटीच्या सहली कराव्यात. तर शिरसाट यांना अत्यंत आपुलकीचा सल्ला वजा इशारा असून, सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या कायद्याने चालणाऱ्या आणि शून्यातून स्वतःचे ओळख उभी करू पाहणाऱ्या महिलेला एकाकी समजू नयेत. तसेच जर तुम्ही गलिच्छ पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ महाराष्ट्रातल्या तमाम जिजाऊ सावित्रीच्या लेकींशी आहे, असे रूपाली पाटील ठोंबरेनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात; शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट