Chhatrapati Sambhaji Nagar: सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करा, शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी पोहचल्या पोलीस आयुक्तालयात
Chhatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत निवदेन दिले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. तर संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठाकरे गटाकडून तक्रारी देखील देण्यात आल्या आहेत. असे असतानाच आता सुषमा अंधारे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात संजय शिरसाट यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवदेन पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत निवदेन दिले आहे.
काय म्हटले आहे निवेदनात...
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे व उद्धव गटाच्या महिला आघाडी यांनी आमदार शिरसाट साहेब यांचे बॅनर बनवून त्याच्या फोटोचा अवमान केला. त्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्ताच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अनेकवेळा आमदार शिरसाट साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांना जनतेमध्ये बदनाम करण्याचे काम या उद्धव गटाच्या माध्यमातून वारंवार होत आहे. त्याला कोणी आळा घालणार आहे का?, कायद्याचा काही धाक यांना राहिलेला नाही. पश्चिम विधानसभा मतदार संघातील हजारो लोकांनी त्यांच्या मनातील आमदार निवडून दिला, सर्व सामान्य जनता ही आमदार साहेबांच्या बाजूने आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रमध्ये बदनाम करण्याचे कटकारस्थान उद्धव गटाच्या लोकांकडून सुरु आहे.
आज पर्यंत अनेक राजकीय व्यासपीठावरुन अनेक नेते एकमेकांवर टीका आणि तक्रारी करत असतात. सुषमा अंधारे यांनी देखील स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत आमदार संजय शिरसाट आणि अनेक बाकी आमदारांवर अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. म्हणून त्यांचा टीकेला उत्तर दिले म्हणून संजय शिरसाट यांच्यावर अनेक खोटे आरोप करण्याचं काम सुषमा अंधारे करत आहेत. सदरील प्रकरण मध्ये जर आपण video बघितला तर आपल्या लक्षात येईल की यात कुठलाच आक्षेपार्ह विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं नाही. फक्त राजकीय प्रसिध्दी म्हणून आमदार संजय शिरसाट यांची बदनामी करण्याचं काम केलं जात आहे..
महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा...
या आधी अनेकदा सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवता असेल. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अशा अनेक गोष्टी वरून अनेक अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टींवर बोलण्याचा अधिकार नाही. तर शहरातील क्रांती चौक येथे उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून अपशब्द वापरून आमदार संजय शिरसाट यांना बदनाम करण्याचं काम करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...
ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, दुर्गा भाटी, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, आशा दातार, सुनीता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, मीरा पाटील, सुचिता आंबेकर, सुकन्या भोसले, सारिका शर्मा, लता त्रिवेदी, मीना थोरवे, विद्या खाडीलकर, मीरा चव्हाण, स्मिता रामचंद्र, छाया जाधव, मीनल राणे, सविता अंभोरे, विमल आव्हाड, शोभा बडे, कांता गाडे, इंदिरा कदम, आशा भामरे, मीरा कदम, प्रेमलता चंदन, प्रतिभा राजपूत, उषा कोरडे, सुनीता गरुड, आरती साळुंखे, मनीषा खरे, रेखा शाह, नीता शेळके, संध्या रावलेलू, रोहिणी काळे, संगीता पवार, वैशाली आरट, कमल भरड, भारती हिवराळे, मंदा भोकरे, रेणूका जोशी, कविता मठपती या महिला आघाडीवरती कडक कारवाई करून आमच्या भावना दुखावल्या गेल्याकारणामुळे IPC 295 प्र. गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
ठाकरे गट Vs शिंदे गट! शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो केल्याने शिवसेना महिला आघाडी पोलिसात जाणार