Marathwada: मराठवाड्यातील नुकसानीचे पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण करा; केंद्रेकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Marathwada : पंचनामे करण्याचे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले आहे.
Marathwada Unseasonal Rain Update: मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, शासकीय कर्मचाऱ्यांना पुकारलेल्या संपामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले आहे. दरम्यान सोमवारी संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात (Marathwada) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे 22 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करा, असे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ 5.61 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत.
मराठवाड्यात 7, 8 आणि 14 ते 19 मार्चदरम्यान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच खरीप हंगामाचे सप्टेंबर, ऑक्टोबरमधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचे अनुदान अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशात आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचे नुकसान केले आहेत. मराठवाडा विभागात अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अशात कालपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचे संप सुरु असल्याने, नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. आतापर्यंत फक्त 5.61 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे 22 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यातील नुकसान आकडेवारी
- नांदेडमध्ये सर्वाधिक 20 हजार 274 शेतकऱ्यांचे 23 हजार 801 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- जालन्यात 11 हजार 634 शेतकऱ्यांचे 15 हजार 93.18 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- लातूर जिल्ह्यात 16 हजार 842 शेतकऱ्यांचे 11 हजार 794.80 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- बीडमध्ये 21 हजार 459 हजार शेतकऱ्यांचे 11 हजार 365 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 हजार 503 शेतकऱ्यांचे 11 हजार 102 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- हिंगोलीत 13 हजार 286 शेतकऱ्यांचे 5 हजार 604 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- परभणीत 4 हजार 250 शेतकऱ्यांचे 3 हजार 275.10 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
पंचनाम्यांची स्थिती
- छत्रपती संभाजीनगरमध्ये 705. 53 हेक्टरातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.
- परभणीत 949.90 हेक्टरातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.
- हिंगोलीत 310 हेक्टरातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.
- नांदेड 2264 हेक्टरातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.
- लातूर 376 हेक्टरातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.
- वरील पाच जिल्ह्यांत 4606.53 हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांचेच पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र जालना, बीड जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवातदेखील झालेली नाही.
महत्वाच्या इतर बातम्या :