Ambadas Danve : राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे; अंबादास दानवेंनी साधला सरकारवर निशाणा
Ambadas Danve : राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं दानवे म्हणाले आहेत. राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आले आहे.
Ambadas Danve On Maharashtra Government : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजेच रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आले आहे. त्यामुळे यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील मुलीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिद्ध झाले आहे. तर राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च 2023 राज्यातून सुमारे 5510 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 1600 मुली तर फेब्रुवारी महिन्यात 1810 तर मार्च महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना पत्र...
महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच, महिला सुरक्षित नसतील तर ही बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
काय सांगते आकडेवारी!
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. ज्यात मार्च महिन्याची आकडेवारी पाहिली असता, पुणे 228, नाशिक 161, कोल्हापूर जिल्ह्यातून 114, ठाणे 133, अहमदनगरमधून 101, जळगाव 81, सांगली 82, यवतमाळ 74 युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी आकडेवारी हिंगोली 03, सिंधूदुर्ग 03, रत्नागिरी 12, नंदूरबार 14, भंडारा 16 येथून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: