Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली
Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणात एकूण 1586.482 दलघमी पाणीसाठा असून, 848.376 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे.
Jayakwadi Dam Water Level : मागील आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सतत पाण्याची (Water) वाढ होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक येथील महत्वाची धरणं भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली होती. मागील चार दिवसांत जायकवाडी धरणात 6 टक्के पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडीत सध्या 39.8 टक्के पाणीसाठा असून, 10 हजार 125 क्युसेकने आवक सुरु आहे. तर, धरणात एकूण 1586.482 दलघमी पाणीसाठा असून, 848.376 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
यंदा मान्सून उशिरा आला, त्यात जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरीही ऑगस्ट महिना कोरडा गेला. सप्टेंबरचे 20 दिवस देखील जवळपास कोरडेच गेले. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले होते. तर, काही महत्वाच्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील अल्प असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठी घट झाली होती. मात्र, मागील चार-पाच दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होतांना पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात 6 टक्के पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 39.8 टक्के झाला आहे.
पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली...
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही शहराला पिण्यासाठी जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सोबतच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण एमआयडीसी, वाळूज, बिडकीन, चिखलठाणा एमआयडीसी मधील उद्योगांना देखील जायकवाडी धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्यास याचे परिणाम थेट या दोन्ही जिल्ह्यांच्या पिण्याच्या आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्यावर होत असते. मात्र, चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरु झाली. पाणीसाठा आता 39.8 टक्के झाला आहे. ज्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली आहे.
जायकवाडी धरणाची आजची आकडेवारी
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1508.56 फूट
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.809 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1586.482 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 843.376 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 39.08 टक्के
- जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 10124
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.410
- उजवा कालवा विसर्ग : 00 क्युसेक
- डावा कालवा विसर्ग : 00 क्युसेक
इतर महत्वाच्या बातम्या: