जळगावातील 'त्या' प्रकरणानंतर राज्यभरात संतापाचे वातावरण, औरंगाबादमधील पत्रकारांकडून कारवाईची मागणी
Aurangabad News : औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्यावतीने ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले
औरंगाबाद: जळगाव (Jalgaon) येथील पत्रकाराला मारहाण (Journalist Beaten) प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले असून, राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्याकडून झालेली शिवीगाळ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad ) जिल्ह्यात देखील पत्रकारांनी एकत्र या घटनेचा निषेध केला आहे. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ (Aurangabad District Marathi Journalists Association) आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्यावतीने ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात काय म्हटले?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी वार्तांकनात टिका करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटाचे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांना फोन करून थेट शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या संभाषणाचा ऑडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
- या धमकीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी जळगाव पोलिसांकडे स्वत:सह कुटुंबाच्या जिवाला धोका असल्यामुळे पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पाचव्या दिवशीच रिपोर्टिंग करून दुचाकीवर घर जात असताना पत्रकार संदीप महाजन यांना गुंड प्रवृत्तीच्या चार जणांनी रस्त्यात आडवून जीवघेणा हल्ला केला.
- या गुंडागर्दीच्या प्रकारानंतर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पत्रकार महाजन यांना शिविगाळ करीत धमकी देणारे आमदार किशोर पाटील यांच्यासह मारहाण करणाऱ्या गुंडाच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न (आयपीसी कलम 307) व पत्रकार संरक्षण क़ायदयानुसार गुन्हा नोंदवून संबंधितांना तात्काळ अटक करावी.
- पत्रकार महाजन यांच्या कुटुंबास पोलिसांचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघातर्फे आपल्या माध्यमातुन राज्य शासनाकडे करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन सादर
औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघाकडून औरंगाबाद पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना निवेदन देण्यात आले. तसेच, खुलताबाद पोलीस, खुलताबाद तहसीलदार, पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोड पोलीस, दौलताबाद पोलीस,फुलंब्री पोलीस, वाळूज एमआयडीसी पोलीस, कन्नड तहसीलदार, करमाड पोलीस, यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच, पाचोराचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.