VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले?
Kannad Vidhansabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात संजना जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
छत्रपती संभाजीनगर : एरव्ही आपल्या भाषणातून विरोधकांवर भडकणारे, त्यांच्यावर टीकेचा आसूड ओडणारे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षाच्या खासदारावर चिडल्याचं दिसून आलं. कन्नडमध्ये शिवसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारासाठी स्टेजवर आल्यानंतर भाषणाला वेळ होणार हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर संताप व्यक्त केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कन्नडमध्ये सभा घेतली. सभेसाठी वेळेचे नियोजन कसे करावे यांच्या सूचना प्रत्येक नेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुख्यमंत्री आले की सत्कार आणि त्यांचे भाषण ठेवावं असं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री कन्नडमध्ये आल्यानंतर उमेदवार संजना जाधव, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची भाषणं राहिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संदीपान भुमरे यांच्यावर घड्याळ दाखवत संताप व्यक्त केला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना पाच ते सहा सभा करायच्या होत्या. त्या नियोजनाबद्दल स्टेजवर ते बोलत असावेत असा त्यांचा हावभाव होता.
पती-पत्नीमध्ये लढत
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजना जाधव या त्यांच्या पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. हर्षवर्धन जाधव हे दोन वेळा आमदार होते. यावेळी ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाच्यावेळी राजपूत यांनी पक्षावर निष्ठा दाखवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
कोण आहेत संजना जाधव?
संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी असून कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे संजना जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.
ही बातमी वाचा :