Drought Situation in Marathwada : मराठवाड्यात दुष्काळ सदृश परीस्थीती, मोसंबी बागेवर शेतकऱ्यानी चालवली कुऱ्हाड
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण येथील शेतकरी कल्याण तळपे यांनी तीनशे मोसंबीचे झाडं तोडली आहे.
छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात (Marathwada) अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. विशेष म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका मोसंबीच्या (Mosambi) बागेला बसतांना पाहायला मिळत आहे. करण यंदा मोसंबीसह अन्य फळबागा जगवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असून, समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव व कूपनलिका कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी शेतकरी मोसंबीच्या बागा तोडत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण येथील शेतकरी कल्याण तळपे यांनी तीनशे मोसंबीचे झाडं तोडली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने बाग जगवणे शक्य नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कल्याण तळपे यांनी 10 वर्षांपूर्वी मोसंबीची तब्बल तीनशे झाडे लावली होती. या काळात त्यांनी मोठ्या कष्टाने मोसंबीची बाग वाढवली. लेकरांप्रमाणे जीव लावून मोठी करून यातून त्यांना उत्पादन देखील मिळत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाला असल्याने विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटले आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील बहुतांश भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार की नाही याची देखील शाश्वती नाही. त्यामुळे मोसंबी बाग जगवणे शक्य नसल्याने तळपे यांनी दहा वर्षांपासून मोसंबी पीक देणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे.
परिस्थिती गंभीर...
यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील अनेक गावात आत्तापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला...
मराठवाड्याची तहान भावणारे जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात आहे. मात्र, त्याच पैठण तालुक्यातील काही गावात आज पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात मोठ्याप्रमाणात मोसंबीच्या बागा देखील आहे. अशात पाणी टंचाईचा फटका या बागायतदारांना बसतांना दिसत आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था पैठणकरांची झाली आहे. तत्काळ पाऊले उचलून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. तर, उन्हाळ्यात निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता त्यानुसार पिण्याच्या पाण्यासाह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्याची मागणी केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: