'आरक्षणासाठी आत्महत्या करतेय', लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीकडून वडिलांनीच लिहून घेतली सुसाईड नोट
Chhatrapati Sambhaji Nagar : वडील आपली हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव करतील असा संशय मुलीला आला आणि ती प्रचंड घाबरून गेली.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यभरात वातावरण तापले असतानाच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीला घरी आणून, तिच्याकडून वडिलांनी 'आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची' सुसाईड नोट लिहून घेतली. त्यानंतर वडील आपली हत्या करतील असा संशय आल्याने मुलीने गुपचूप आपल्या मित्राला याबाबत मेसेज केला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. मैत्रिणीचा मेसेज आल्यावर तरुणाने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर या मुलीची सुटका झाली.
अधिक माहितीनुसार, शहरातील एन-2 मध्ये राहणाऱ्या प्रीतज घोळवे नावाच्या तरुणाचे शाळेत सोबत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमप्रकरण जमले. दरम्यान, कायद्याने सज्ञान होताच दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांनी घर सोडून एन-9 मध्येच भाडेतत्वावर स्वतंत्र घर घेऊन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. याचवेळी मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज ठाण्यात दिली. पोलिसांनी मुलीला आणि तिच्या मित्राला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मात्र, ‘मला आई वडिलांकडे राहायचे नसून, मित्र प्रीतज सोबत राहायचे आहे’ असा जबाब मुलीने पोलिसांना दिला.
मुलीकडून वडिलांनी लिहून घेतली सुसाईड नोट
मुलीने घरी येण्यास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांनी पुन्हा 5 नोव्हेंबर रोजी तिचे घर गाठले. तसेच तिच्या मित्राला मारहाण करून मुलीला पुन्हा आपल्या घरी आणले. तसेच तिचा मोबाईल देखील स्वतः जवळ ठेवून घेतला. या दरम्यान काही दिवसांनी वडिलांनी तिच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. ज्यात, ‘आरक्षण नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत असून, त्यामुळे शिकू शकत नाही आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असून, कोणालाही जबाबदार धरू नये.’ असा त्यात मजकूर होता. सोबतच या चिठ्ठीवर मुलीचा अंगठा देखील घेतला. त्यामुळे वडील आपली हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव करतील असा संशय मुलीला आला आणि ती प्रचंड घाबरून गेली.
अन् पोलीस पोहचले मुलीच्या घरी...
मुलीला घरी नेल्यावर तिच्या वडिलांनी तीच मोबाईल देखील स्वतः जवळ ठेवल्याने मुलीला कोणालाही संपर्क करता येत नव्हता. त्यात वडील आपली हत्या करतील अशी भीती तिच्या मनात होती. या दरम्यान तिने कुटुंबातील एका सदस्याचा नजर चुकवून मोबाईल घेतला. त्यावरून, ‘हे मारून टाकतील रे मला, लवकर ये’ तसेच ‘तो दिसला तर त्याला तेथेच संपवा व हिलापण,’ असे सतत बोलत असल्याचा मेसेज आपल्या मित्राला केला. प्रीतजला मेसेज येताच त्याने थेट पोलिसांत धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेची गंभीरपणे दखल घेत तत्काळ मुलीचे घर गाठले. तसेच, मुलीसह तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, तेथेही मुलीगी प्रीतजसोबत राहण्यावर ठाम होती. त्यानंतर प्रीतजच्या तक्रारीवरून मुलीचा आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kalyan Crime : 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये घात झाला, प्रेयसीला संपवलं, कल्याण हादरलं!