(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्तथरारक! अट्टल गुन्हेगार पुढे पोलीस मागे..,तीन तास पाठलाग; भरपावसातला थरार
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मुसळधार पाऊस सुरु असतांना पोलिसाच्या पथकाने या आरोपीला पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहर पोलिसांच्या पुंडलीकनगर पोलीसांनी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास मुसळधार पावसात (Rain) तीन तास पाठलाग करुन गावठी पिस्टलसह जेरबंद केले आहे. तसेच त्याच्या ताब्यातून पिस्टलसह एक बुलेट देखील जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरून मुसळधार पाऊस सुरु असतांना पोलिसाच्या पथकाने या आरोपीला पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. गुड्डु उर्फ मॅक्स उर्प शेख जुबेर शेख मकसुद (वय 37 वर्षे, रा. विजयनगर छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी अटक केलेला गुड्डु हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. तर, गुड्डू हा काहीतरी घातपात करण्याच्या इराद्याने स्वतः जवळ पिस्टल बाळगून परिसरामध्ये पिस्टलचा धाक दाखवून धमकावत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. महिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना केल्या. ज्यात पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. काळे यांच्यासह पथकाला कारवाईसाठी तत्काळ रवाना होण्याचे सांगितले.
दरम्यान, कारवाईसाठी गेलेल्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार गुड्डूचा शोध सुरु केला. पोलिसांनी तब्बल तीन तास त्याचा शोध घेत मुसळधार पावसात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा पाठलाग केला. दिवसभर त्याचा शोध घेऊन देखील तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी कारवाईसाठी गेलेल्या पथकाने शनिवारी (23 सप्टेंबर) रोजी रात्री 10 वाजता गुड्डूच्या राहत्या घरी सापळा लावला. तसेच गुड्डू घरात असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्याला राहत्या घरातून शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल व त्यात एक बुलेट असे मिळुन आले. पोलिसांनी पिस्टल व बुलेट त्याच्या ताब्यातून जप्त केली आहे. तसेच त्याच्याविरोधात गु.र.नं. 352/2023 कलम 4,25 भा.ह.का.सह कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई...
सदरची कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजश्री आडे, सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, संदीप काळे, सहायक फौजदार व्हि. व्ही. मुंढे, पोलीस नाईक जालींदर मान्टे, गणेश डोईफोडे, दिपक देशमुख, पोलीस अमलदार कल्याण निकम, संदीप बिडकर, प्रशांत नरवडे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: