छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई
Chhatrapati Sambhaji Nagar : या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 जानेवारीपर्यंत अंमलात असतील. या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केल्यानंतर आता जिल्ह्यात विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई असणार आहे. त्यामुळे 15 जानेवारी पर्यंत ग्रामीण भागात कोणतेही मोर्चे, आंदोलन, धरणे आंदोलन किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठका घेण्यास मनाई असणार आहे. तसेच, यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी नओद्लन आणि मोर्चे काढले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मनाई आदेश जरी करण्यात आले असतानाच, जिल्ह्य प्रशासनाने आणखी एक आदेश काढला आहे. जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 च्या उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा तसेच शांतता क्षेत्र वगळून) ध्वनिची विहित मर्यादा राखून 15 दिवस शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सन 2024 मध्ये शिथिलता द्यावयाचे 15 दिवस निश्चित करण्यात आले असून, या दिवशी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्गमित केले आहेत.
निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे-
- शिवजंयती 19फेब्रुवारी
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल
- श्रीगणेश चतुर्थी 7 सप्टेंबर
- ज्येष्ठागौरी पूजन 11 सप्टेंबर
- अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर
- ईद ए मिलाद 16 सप्टेंबर
- अष्टमी 11 ऑक्टोंबर
- नवमी 12 ऑक्टोंबर
- दिवाळी (लक्ष्मीपूजन) 1 नोव्हेंबर
- ख्रिसमस 25 डिसेंबर
- नवीन वर्ष 31 डिसेंबर
- या शिवाय उर्वरित चार दिवस राखीव असून, कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सूट दिली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाची संभाजीनगरात मोठी कारवाई; विघातक हालचालींचा संशय, 14 जणांना नोटीस